28 February 2020

News Flash

पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकमध्ये जनजीवन ठप्प

मातीचा भराव पडल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित

कसारा घाटातील बोगद्यासमोरील रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा कोसळला. (छाया - जाकीर शेख)

इगतपुरी तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपले असून वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या दरवाजावर दरड कोसळली आहे. कसारा घाटातील हिवाळा पुलाजवळील बोगद्याबाहेर रेल्वे पुलावर सकाळी मातीचा ढिगारा पडल्याने नाशिक-मुंबईदरम्यानच्यी वाहतूक काही काळ ठप्प झाली. मातीचा ढिगारा बाजूला केल्यावर वाहतूक सुरू झाली असली तरी अनेक गाडय़ा विलंबाने धावत आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मोरचोंडी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. काही तालुक्यात पावसाने रिमझिम स्वरूपात हजेरी लावली, तर काही भागाकडे पूर्णत: पाठ फिरवली.

जिल्ह्य़ात २४ तासांत एकूण ३६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक १७२ मिलिमीटर पाऊस एकटय़ा इगतपुरीत झाला. नाशिक (११), दिंडोरी (१४), येवला (२२) असे पावसाचे प्रमाण राहिले. पेठ, निफाड, सिन्नर, सुरगाणा परिसरात रिमझिम सरी बरसल्या. पावसाचा रुद्रावतार इगतपुरीमध्ये पाहायला मिळाला. सलग २४ तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इगतपुरी तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी केले. पश्चिम पट्टय़ात दरड कोसळणे, मातीचा भराव रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना घडल्या.

घोटीपासून जवळच वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. डोंगरावरून दरड थेट प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोसळली. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला. मध्य रेल्वेच्या मार्गावरील गाडय़ा एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.

गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ  

त्र्यंबकेश्वर येथील मुसळधार पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ होऊन ते निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. या समूहातील इतर धरणांमधील जलसाठय़ातही वाढ होत आहे. जिल्ह्य़ात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्याचा लाभ परिसरातील धरणांमधील जलसाठा उंचावण्यात होत आहे. याआधी गंगापूर धरणाने तळ गाठल्याने शहरात ऐन पावसाळ्यात कपात लागू करावी लागली. सद्य:स्थितीत शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. आठवडय़ातील प्रत्येक गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. गंगापूरचा साठा ९० टक्क्यांवर गेल्यावर कपात मागे घेण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. महिनाभर प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसामुळे अवघ्या काही दिवसांत गंगापूरच्या जलसाठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात २६८४ अर्थात ४८ टक्के जलसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरण रात्रीतून ५० टक्क्याची पातळी ओलांडेल असा अंदाज आहे. यामुळे नाशिकवरील पाणीकपात लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये जलसाठा उंचावत आहे. याच परिसरातील भावली धरण भरण्याच्या मार्गावर असून दारणा, मुकणे, वालदेवी धरणांच्या साठय़ात वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. काही भागापुरताच पाऊस मर्यादित राहिल्याने उर्वरित धरणांमध्ये जलसाठा उंचावलेला नाही. माणिकपूंज, केळझर, नाग्यासाक्या, भोजापूर, तीसगाव, पुणेगाव ही धरणे अद्याप कोरडी आहेत.

First Published on July 12, 2019 1:23 am

Web Title: due to the rain igatpuri trimambak stop abn 97
Next Stories
1 धरणांच्या दुरुस्तीला कात्री लागण्याची शक्यता
2 उद्योगविस्तारासाठी आता अन्य वसाहतींतही भूखंड
3 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यापीठ उपकेंद्रात आंदोलन
Just Now!
X