ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट

दसऱ्यानिमित्त शहरी भागातील बाजारपेठांनी मंदीतून सावरण्याची संधी साधली असताना ग्रामीण भागात मात्र दुष्काळाच्या सावटामुळे दसऱ्याचा आनंद जाणवलाच नाही. घरापासून सुवर्ण, दागिन्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू तसेच वाहन खरेदीच्या निमित्ताने एकाच दिवसात कोटय़वधींची उलाढाल झाली. ग्रामीण भागातील बाजारपेठांवर मात्र दुष्काळ, पाणी टंचाईचे सावट पाहावयास मिळाले. पावसाअभावी यंदा खरिपाच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले असून त्याचा परिणाम ग्रामीण बाजारपेठांवर झाला.

पावसाअभावी यंदा झेंडूच्या फुलांची आवक कमी होईल, अशी शक्यता होती, परंतु झेंडूची फुले विपुल प्रमाणात बाजारात आली. परिणामी बुधवारी रात्री ६० ते १०० रुपये शेकडा असणारा भाव गुरुवारी सकाळी थेट २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली घसरला. ग्रामीण भागातून आलेल्या विक्रेत्यांनी दुपापर्यंत मिळेल त्या भावात फुले विकण्याची धडपड केली. मेहनतीने तयार केलेले हार अत्यल्प किमतीत विकले. इतके सारे करूनही अनेकांना सुकलेली फुले विक्रीविना सोडून देण्याची वेळ आली.

प्रादेशिक परिवहन विभागाने नवीन वाहनांच्या नोंदीसाठी कार्यालयीन कामकाज सुटी असूनही सुरू ठेवले.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी विविध योजनांचा पाऊस पाडला. अत्यल्प व्याज दरावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध असल्याने टीव्ही, फ्रिज यांची धडाक्यात खरेदी झाली. उलाढालीत सराफ बाजार कुठेही मागे राहिला नाही. या दिवशी काहींनी लग्नसराईतील खरेदी करून घेतली. दसऱ्यानिमित्त सराफ व्यावसायिकांनी पेशवेकालीनपासून ते आतापर्यंतच्या आधुनिकतेपर्यंतचे आकर्षक सजावटीत घडविलेले दागिने सादर केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरातील वेगवेगळ्या भागांत सहा गटांमार्फत संचलन करण्यात आले. नाशिकरोड, भोसला, पंचवटी, सिडको, इंदिरानगर, आडगाव-म्हसरूळ गटामार्फत विजयादशमी संचलन करण्यात आले. त्यात गणवेशातील बाल, तरुण, प्रौढ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. आनक, शंख, वंशी, झल्लरी, त्रिभुज आदी वाद्यांच्या घोषवादनात शिस्तबद्ध संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता, केवळ आपल्या कृतीतून राष्ट्रभक्ती, त्याग, बंधुभाव दाखवून देणारे संघाचे कार्य आहे. सामाजिक, बौद्धिक आणि शिस्त हे सर्वाचे प्रथम कर्तव्य असायला हवे, असे डॉ. सागर मंडलिक यांनी या वेळी सांगितले.

ठिकठिकाणी शस्त्रपूजन

विजयादशमी दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परिसरात आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत शस्त्रपूजन करण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयातील शस्त्रांचे पूजन कमांडर विनायक आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. भोसला सैनिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे अश्वपूजा आणि शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., संस्थेचे सरकार्यवाह दिलीप बेलगावकर आदी उपस्थित होते.