दसऱ्याच्या दिवशी दुर्जनांवर विजयाचे प्रतिक म्हणून इतरत्र रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात असतांना आदिवासी भागात मात्र ठिकठिकाणी आदिवासींचा राजा म्हणून जयजयकार करीत रावणाची ताटी (मुखवटे) मिरवणूक काढण्यात आली.

सुरगाणा तालुक्यातील अतीदुर्गम पिंपळसोंडपैकी  उंबरपाडा येथील आदिवासी कलाकार माजी सैनिक शिवा चौधरी आणि अन्य ग्रामस्थांनी दसऱ्यानिमित्त गाव परिसरातून रावणाची ताटी मिरवणूक काढली. उंबरखेडे  हे छोटेसे गाव. लोकवस्ती जेमतेम अडीचशे ते तीनशे. गुजरात सिमेलगत असलेल्या या भागाकडे शासनाच्या विकासाच्या योजना पोहचलेल्याच नाहीत. मूलभूत सुविधांची वाणवा आहे. रुढी, परंपरा, संस्कृतिचे आदिवासींकडून आजही जतन केले जात असून नैसर्गिक  साधन संपत्तीचे संवर्धनही करीत आहेत. उंबरपाडय़ाचे आदिवासी कलाकार चौधरी ६० वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी लंकापती  राजा रावणाच्या ताटीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून मिरवणूक काढतात. आदिवासी भागात होळीनंतर बोहाडा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात रामायण, महाभारतातील विविध पात्रांचे सोंग आणले जाताता. त्यात रावणाची ताटी नाचविणे अधिक मानाचे समजले जाते.  या पाडय़ावर ‘तातापाणी माता कणसरा’ आदिवासी कला पथकाच्या माध्यमातून बोहाडय़ाची सोंगे नाचवली जातात. गुरूवारीही  रावणाच्या  ताटीची मनोभावे पूजा करण्यात येऊन ताटी नाचविण्यात आली.

आपल्याकडे रावणाला दुष्ट समजले जात असले तरी आजही उंबरपाडासारख्या अतीदुर्गम आदिवासी भागात  रावणाला आदर्श मानले जाते. रावणाकडून घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत. त्यामुळे त्याची पूजा केली तर काहीही बिघडत नाही. रावणाचा पुतळा जाळण्यापेक्षा जिवंत माणसांमधील अपप्रवृत्तींचा नाश करण्याची अधिक गरज आहे.  भविष्यात गावात रावणाचे मंदिर बांधण्याचा मानस असून याकरीता समाजाने  हातभार लावावा, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

आदिवासी परंपरा जपणे महत्वाचे

आदिवासी कला, रुढी, परंपरा, संस्कृती, सदाचार, गाणी, देवपूजा, निसर्गपूजा, आदिवासी  वाद्य तरुण पिढी विसरत चालली आहे.  समाजातील चांगल्या  चालीरीती टिकविणे हे आज तरुणांपुढे आव्हान आहे. आदिवासी बचाव कृती समिती, आदिवासी एकता परिषद, मूळनिवासी मुक्ती मंच यासारख्या संघटना त्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.  हा आशेचा किरण आहे.   – शिवा चौधरी  (माजी सैनिक, बोहाडा उत्सव कलाकार रा.पिंपळसोंड)