नाशिक : आधुनिक सुरक्षा वैशिष्ठय़े सामावणाऱ्या ई-पारपत्राची छपाई नाशिकरोड येथील भारत प्रतिभृती मुद्रणालयात होणार आहे. या पारपत्रात इलेक्ट्रॉनिक चीप असेल. चीपमध्ये पारपत्रधारकाची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल. ई- पारपत्रासाठी लागणारी व्यवस्था करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या भारत प्रतिभृती मुद्रणालयात पारपत्र, मुद्रांक, धनादेश, टपाल तिकीटे आदींसह महत्वाच्या दस्तावेजांची छपाई केली जाते. देशात पारपत्राची छपाई केवळ याच मुद्रणालयात केली जाते. ई-पारपत्राच्या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालयाने मुद्रणालय प्रशासनाशी चर्चा केली आहे. सरकार दरवर्षी साधारणत: एक कोटी पारपत्र जारी करते.

प्रगत देशात इलेक्ट्रॉनिक चीप असलेली ई -पारपत्रे उपलब्ध केली जातात. भारतात मात्र लहान डायरीच्या स्वरुपात असणाऱ्या पारपत्राची छपाई केली जाते. या पारपत्राऐवजी इलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई – पारपत्र देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली आहे. बराच काळ  रखडलेली ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. नाशिकरोडच्या मुद्रणालयात १९५८ मध्ये पहिल्या पारपत्राची छपाई झाली होती. आजपर्यंत तब्बल २० कोटी पारपत्राची छपाई झाली आहे. या आर्थिक वर्षांत एक कोटी पारपत्र छपाईचे लक्ष्य आहे. आता लवकरच ई -पारपत्राची छपाई सुरू होईल. त्याची पूर्वतयारी प्रगतीपथावर आहे. त्यासाठी दोन खास यंत्रे असून त्यातही वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

फरक काय ?

पुस्तक स्वरुपातील भारतीय पारपत्र आणि नवे ई-पारपत्र यामध्ये लक्षणीय फरक असेल. पुस्तक स्वरुपातील पारपत्र तपासणीत वेळ जातो. त्याच्या सुरक्षेबाबत त्रुटी राहू शकतात. नवे पारपत्र पुस्तक स्वरुपात राहील. पण, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चीप समाविष्ट असेल. त्यात पारपत्रधारकाची संपूर्ण माहिती समाविष्ट केलेली असेल. प्रगत तंत्रज्ञानामुळे ते अधिक सुरक्षित राहील. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही. संगणकाद्वारे पारपत्रधारकाची चीपमधील संपूर्ण माहिती लगेचच उपलब्ध होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.