नाताळच्या सुट्टीमुळे नाशिकमध्ये केंद्रबिंदू शोधण्यात असमर्थता

शहरापासून ४० ते ५० किलोमीटरच्या परिघात सोमवारी सकाळी ३.२ इतक्या रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्य़ाची नोंद झाली आणि नाताळच्या सुटीच्या दिवशी त्याचा केंद्रबिंदू शोधताना प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळ समोर आला. सौम्य स्वरुपाच्या धक्क्य़ामुळे कुठे हानी वा किमान हादरे जाणवल्याचे देखील वृत्त नव्हते. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) भूकंप मापन केंद्रात ही नोंद झाली. परंतु, तीन केंद्रांवरील नोंदीची माहिती मिळाल्याशिवाय त्याचा केंद्रबिंदू शोधता येणार नव्हता. प्रशासनाने आसपासच्या तालुक्यांमध्ये हादरे जाणवले काय, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठूनही धक्के जाणवल्याची माहिती येत नसल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले. या घटनाक्रमाने केंद्रबिंदूचे गूढ कायम राहिले.

नाशिकजवळील मेरी येथील भूकंपमापन केंद्रात सकाळी पावणे दहा वाजता भूकंपाच्या धक्क्य़ाची नोंद झाली. या केंद्रापासून ४० ते ५० किलोमीटरच्या परिघात त्याचा केंद्रबिंदू असून १९५ सेकंद हे धक्के जाणवल्याचे भूकंपमापन केंद्रातून जिल्हा प्रशासन अर्थात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविले. शहरापासून ८० ते ९० किलोमीटर अंतरावरील कळवणच्या दळवट भागात अधुनमधून धक्के बसतात. यामुळे त्या भागात केंद्रबिंदू असल्याचे यंत्रणेचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, संस्थेने सांगितलेले अंतर आणि कळवणचा परिसर यामध्ये कमालीची तफावत असल्याने तो मुद्दा निकाली निघाला. तेथील ग्रामस्थांना तसे काही जाणवलेले नव्हते. भूकंपाच्या केंद्रबिंदुविषयी सर्वाना जाणून घ्यायचे होते. पण, तीन भूकंपमापन केंद्रातील नोंद समजल्याशिवाय केंद्र बिंदू निश्चित करण्यास असमर्थता समोर आली. सुटीच्या दिवशी ती माहिती मिळणार नसल्याने मंगळवारी केंद्रबिंदूची स्पष्टता करता येईल. तसेच भूगर्भातील वरच्या पातळीवरील हालचालींची नोंद कधीकधी अन्य केंद्रावर होत नसल्याचा मुद्दा मेरी या संस्थेकडून मांडण्यात आला.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी ध्वनिहून अधिक वेगाने धावणाऱ्या सुखोई विमानाच्या सरावावेळी  मोठा आवाज होऊन खिडक्यांना हादरे बसत असत. हा धक्का म्हणजे तसा प्रकार नसल्याचे मेरीच्या संशोधन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भूकंपमापन केंद्रावर भूगर्भातील घडामोडींची नोंद होते. जमिनीवरील घडामोडींची नोंद होत नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

काय झाले?

शासकीय सुटी असल्याने अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून भूकंपाचे धक्के नक्की कुठे जाणवले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, नाशिक सभोवतालच्या सिन्नर, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमधून तसे हादरे जाणवल्याचे समजत नव्हते. खुद्द नाशिक शहरात अनेकांनी सकाळी काही धक्के जाणवले नसल्याचे सांगितले. पेठ वा आसपासच्या परिसरात केंद्रबिंदू असल्याचा अंदाज काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या धक्क्य़ांमुळे कुठेही हानी झाली नसल्याचे सांगितले. भूकंपाच्या धक्क्य़ामुळे भयभीत होऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले. उशिरापर्यंत भूकंपाच्या धक्क्य़ाचा केंद्रबिंदू निश्चित होऊ शकला नाही.