16 January 2019

News Flash

प्लास्टिकबंदीतून पर्यावरणपूरक रोजगार

बंदीमुळे प्लास्टिक उद्योगावर काही अंशी परिणाम झाला असला तरी या बंदीतून पर्यावरणपूरक रोजगार उपलब्ध होत आहे.

नॅबतर्फे कागदी, कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण

बंदीमुळे प्लास्टिक उद्योगावर काही अंशी परिणाम झाला असला तरी या बंदीतून पर्यावरणपूरक रोजगार उपलब्ध होत आहे. बाजारपेठेतील या मंदीचा अभ्यास करत नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंडच्या (नॅब) वतीने कागदी तसेच कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थीना देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या पुढे जात या उत्पादनाला बाजारपेठ मिळवण्याचा संस्थेचा प्रयत्न असून या दृष्टीने व्यावसायिकांशी चर्चा सुरू आहे.

नॅबच्या वतीने ३० अंध प्रशिक्षणार्थीना त्यांच्या स्वतच्या पायावर उभे राहता यावे, आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावे यासाठी शिक्षणासह  उद्योजकीय कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या दृष्टीने त्यांना झाडू बनविणे, पेन तयार करणे, कागदी द्रोण आणि थाळ्या, साफसफाईचे सामान  तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच, क. का. वाघ शैक्षणिक संस्थेकडून त्यांच्याकडे बॉक्स फाइलची मागणी आहे. त्यानुसार ही सर्व मंडळी वेगवेगळी कामे करत असून त्यासाठी आवश्यक कसब त्यांनी आत्मसात केले आहे. प्लास्टिकबंदीमुळे औषध विक्रेते, कापड विक्रेते तसेच धान्य व्यापारी यांची अडचण झाली आहे. एरवी प्लास्टिक पिशव्यांमध्ये देण्यात येणारा माल द्यावयाचा कसा, यासाठी काहींनी कागदी तसेच गरजेनुसार कापडी पिशवीचा पर्याय स्वीकारला आहे. व्यावसायिकांची ही गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या आकारातील कागदी लिफाफे, मोठय़ा आकारातील कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून लवकरच प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. प्रशिक्षण कालावधीत लागणारे कच्चे साहित्य त्यांना पुरविले जाणार आहे. या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी औषध विक्रेते, धान्य व्यापारी, कापड व्यावसायिक यांच्याशी बोलणी झाली असून मागणी तसा पुरवठा यानुसार हे काम सुरू राहणार असल्याची माहिती नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली. पुढील टप्प्यात मुक्त विद्यापीठाशी चर्चा करत प्रशिक्षणार्थीना पावसाळ्याचा हंगाम पाहता रोपवाटिका प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जेणेकरून विविध प्रकारची जैवविविधता अभ्यासत पर्यावरणपूरक व्यवसाय जोपासला जाईल यासाठी नॅबचे प्रयत्न आहेत.

प्रशिक्षणार्थीनी विद्यावेतन

नॅब कुठल्याही सरकारी मदतीशिवाय या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणून दिवसाला ५० रुपये तसेच त्यांना येण्या-जाण्याचा खर्च असे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दिवसाला १०० रुपये खर्च करत आहे. यातील काही विद्यार्थी प्रशिक्षणानंतर लघु उद्योजक झाले असून काही भांडवलाअभावी दुसऱ्या ठिकाणी काम करत आहे. नॅबला जागेची तसेच कधी निधीची अडचण असल्या कारणास्तव प्रशिक्षणा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी फारसे काही करता येत नाही, अशी खंत मुनशेट्टीवार यांनी व्यक्त केली.

First Published on June 8, 2018 1:15 am

Web Title: eco friendly employment from plastic