News Flash

पर्यावरणस्नेही विसर्जनाकडे वाढता कल

हिंदू जनजागृती समितीचा विरोध

हिंदू जनजागृती समितीचा विरोध

वाजत गाजत आलेल्या गणरायाला निरोप देण्याचा क्षण समीप आला असताना विसर्जनामुळे प्रदुषणात भर पडु नये यासाठी प्रशासनासह काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘देव द्या, देवपण घ्या’, ‘निर्माल्यातून फुलाकडे’ यासह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन अशा विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने प्रबोधनावर भर दिला जाणार आहे. गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पध्दतीने व्हावे यासाठी जय्यत तयारी सुरू असताना हिंदू जनजागृती समितीने त्यास विरोध केला आहे. गणेश मूर्ती कृत्रिम हौदात नव्हे तर, धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जित करा, असे आवाहन समितीने केले आहे.

नाशिक महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी मूर्ती संकलनासोबत प्रायोगिक तत्वावर कृत्रिम तलावात अमोनियम बायकाबरेनेटच्या मिश्रणात ‘पीओपी’च्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे नियोजन केले आहे. गणेशमूर्तीच्या वजनाइतके अमोनियम पाण्यात विरघळवून त्यात गणेश मूर्ती ४८ तास ठेवल्यास मूर्ती मिश्रणात पूर्णपणे विरघळणार आहे. महापालिका प्रत्येक भाविकास दोन किलो अमोनियम बायकाबरेनेट मोफत देणार आहे. मूर्ती विरघळलेले मिश्रण हे झाडांसाठी पोषक राहील. यासाठी नाशिक पश्चिमसाठी ए. पी. खिल्लारे (९४२३१ ७९१७३), नाशिक पूर्वसाठी पी. डी. पाटील (९४२३१ ७९१७२), पंचवटीसाठी एस. आर. गोसावी (९४२३१ ७९१७६), सातपूरसाठी एस. के. गांगुर्डे (९४२३१ ७९१७५), सिडको येथे आर. बी. गाजरे (९४२३१ ७९१७५), नाशिकरोड येथे एस. व्ही. दराडे (८२७५० ८८५१३) यांच्याशी संपर्क साधावा.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने ज्या ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे, त्या ठिकाणी भाविकांना मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा तिचे दान करा असे आवाहन करण्यात येणार आहे. पीओपी मूर्ती विसर्जनामुळे प्रदुषणात पडणारी भर, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले. नेचर क्लब ऑफ नाशिक विर्सजनाच्या दिवशी गंगापूर धबधब्याजवळ ‘निर्माल्यातून फुलाकडे’ हा उपक्रम राबविणार आहे. विसर्जनासाठी परिसरात आलेल्या भक्तांना निर्माल्य नदीत टाकू नका ही विनंती करून निर्माल्यापासून घरी खत कसे बनविता येते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या निर्माल्यातून सुंदर फु ले उमलून त्याचा पूजेसाठी वापर करता येणार आहे. कुंडी कशी भरायची, कोकोपीट, गांडूळखत, माती आणि निर्माल्याचा वापर कसा करायचा हे देखील सांगितले जाणार आहे. यावेळी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचे दान स्विकारले जाणार आहे. नागरिकांनी निर्माल्य व मूर्ती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा यांनी केले. पीओपी व रासायनिक रंगाच्या मूर्तीपासून गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने ‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चोपडा लॉन्स येथील गोदापार्क परिसरात मूर्ती संकलनाचे काम करण्यात येणार असल्याचे कृती समितीचे आकाश पगार यांनी सांगितले.

पर्यावरण वाद्यांवर हिंदू जनजागृतीचे टिकास्त्र

वर्षांतील ३६४ दिवस निद्राधिन असणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिस गणेशोत्सव आला की प्रदूषण होते म्हणून ओरड करायला लागतात. संबंधितांनी इतर धर्मियांच्या सणोत्सवावेळी होणाऱ्या प्रदूषणावर कधी आक्षेप घेतला आहे काय, असा प्रश्न करत हिंदु जनजागृती समितीने गणेश मूर्तीचे कृत्रिम हौदात नव्हे तर वहात्या पाण्यात विसर्जन करा, असे आवाहन केले आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करा असे म्हणणारे इतर धर्मियांच्या सणोत्सवावेळी मूग गिळून बसतात. केवळ हिंदू सणांना विरोध करून लक्ष केले जात आहे. कृत्रिम हौदात गणेश विसर्जन केल्यावर त्यांची पुढे विटंबना होते. हे टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अनंत चतुर्थीला मूर्तीचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे समितीचे शशिधर जोशी यांनी म्हटले आहे. कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी काही पर्यावरणवादी आणि अन्य संघटना यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांचा अनुचित वापर केला जाणार असल्याची माहिती आहे. असे यावेळी कुठे घडल्यास संबंधित शाळांच्या विरोधात तक्रारी करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई

ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास सार्वजनिक गणेश मंडळांवर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाआधी पोलिसांनी मंडळांना डिजेचा वापर न करण्याचे आवाहन केले होते. त्यास अनेक मंडळांकडून प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत डिजेच्या वापरास पोलिसांचा आक्षेप आहे. त्यात ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:29 am

Web Title: eco friendly ganesh idol immersion in nashik
Next Stories
1 मतिमंद मुलांच्या स्वकमाईचा ‘श्रीगणेशा’
2 नोटीस बजावली, कारवाई केव्हा?
3 महामार्ग, स्मार्ट सिटी विरोधात सर्वपक्षीय एकी
Just Now!
X