शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली  काही पदाधिकाऱ्यांनी ७१ लाख ११ हजार २७१ रुपये देणगी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी येथील सह्य़ाद्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जागृती कर्णबधिर निवासी विद्यालय या शाळेसाठी निधी तथा मदत मिळावी म्हणून संस्थेच्या  संशयित नवल सोनार आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुंबई येथील पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळाच्या अध्यक्षा शितल पंडित यांची २००६ मध्ये भेट घेतली. त्यांच्याकडून कर्णबधिर मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्य़ा, पुस्तके, शालेय गणवेश, निवासी सुविधा तसेच निधी  मागितला. पंडित यांनी आर्थिक मदत केल्यानंतर घाटनदेवी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था मूकबधीर कर्णबधीर अपंग मुलांकरिता नवीन शाळा सुरू करत असल्याचे सांगितले गेले. यासाठी इमारत निधी उपलब्ध करून घेतला असून इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.  त्या इमारतीत इंदिरा भारती कर्णबधिर अनसूयात्मजा मतिमंद असे निवासी विद्यालय सुरू केले आहे. त्यासाठी फर्निचर, जेवण, शिक्षकांचे पगार तसेच देखभाल  दुरूस्तीसाठी लागणारा खर्च दाखवून पंडित यांच्याकडून वेळोवेळी निधी मागवण्यात आला.  विद्यालयासाठी लागणाऱ्या खर्चाच्या बनावट पावत्या पंडित यांना देण्यात आल्या.  २०१५ पर्यंत त्यांनी अशा पद्धतीने पैसे उकळण्याचे काम सुरू ठेवले होते. परंतु आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर पंडित यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करून तो इगतपुरी येथील पोलीस ठाण्यात वर्ग केला. निधी म्हणून उकळलेल्या पैशाचा वापर विद्यालयासाठी न करता  पैशांचा अपहार केल्याचा आरोप पंडित यांनी केला आहे.