20 September 2020

News Flash

बालमजुरांना मूलभूत शिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र

निधीची उपलब्धता, संस्थांचे सहकार्य अपेक्षित

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जिल्हा परिसरातून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्य़ाचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिसरात बालकामगारांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसाहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प प्रयत्नशील आहे.

तीन वर्षांपासून या संदर्भात सर्वेक्षण झालेले नाही. दुसरीकडे, जुन्या कायद्यानुसार धोकादायक आणि असुरक्षित अशी विभागणी करत १८ उद्योग आणि ५७ व्यवसाय प्रक्रियांमध्ये काम करण्यास बालकांना बंदी करण्यात आली होती. नव्या कायद्यानुसार ही व्याप्ती वाढविण्यात आली असून धोकादायक किंवा असुरक्षित अशी विभागणी न करता शाळाबाह्य़ तसेच कुठल्याही प्रकारचे काम करणाऱ्या १८ वर्षांआतील बालकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा बालकांचा शोध घेण्याचे आवाहन आता राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पासमोर असून त्यासाठी जिल्हा स्तरावर समाजकार्य महाविद्यालयांची मदत घेण्यात येत आहे.

सर्वेक्षणासाठी जिल्हा परिसरातील ओझर, निफाड, मालेगाव, पिंपळगाव, पेठ, सुरगाणासह शहरातील गोदाकाठ, पंचवटी, बाजार समिती परिसर, गावठाण परिसर अशी १७१ ठिकाणे ज्या ठिकाणी बालकामगार आहेत ती शोधली असून त्यांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सूक्ष्म स्तरावर नियोजन करत काम सुरू आहे. साधारणत: एक ते दीड महिन्यात यासंदर्भातील आकडेवारी उपलब्ध होईल, अशी माहिती बालकामगार प्रकल्प समन्वयक जयप्रकाश देशमुख यांनी दिली.

निधीची उपलब्धता, संस्थांचे सहकार्य अपेक्षित

आधी किमान ५० बालकांसाठी केंद्र सुरू करता येईल ही अटही केंद्र सरकारने शिथिल केल्याने जिल्हा परिसरात ठिकठिकाणी किमान २० बालकांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात बालकाचे वय, त्याच्या सभोवतालची सामाजिक स्थिती आणि त्याची आकलन क्षमता याचा विचार करता त्याला किमान शिक्षण देत शिक्षण हक्क कायद्यानुसार त्याला जिल्हा तसेच तालुकापातळीवरील शासकीय शाळांमध्ये दाखल करण्यात येईल. मागील वर्षी तीन हजार बालकांना सरकारी शाळेत सामावून घेण्यात आले असून ते नियमितपणे शाळेत येत असल्याचा दावा प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला. नव्या केंद्रातही मुलांना किमान शिक्षण देता यावे यासाठी निधीची उपलब्धता आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य यावर पुढील कामाची दिशा ठरणार आहे. अन्यथा केंद्रावर स्वत: प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी मुलांचा अभ्यास घेतील, अशी तयारी प्रकल्पाच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:46 am

Web Title: education training center for child labor in nashik
Next Stories
1 पंतप्रधान मातृवंदन योजनेचा अडखळता प्रवास
2 महापालिकेविरोधात फेरीवाले रस्त्यावर
3 ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ गायब
Just Now!
X