धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाला जिल्ह्य़ातील केवळ तीन मंडळांचा प्रतिसाद

धर्मादाय आयुक्तांनी समाजातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्ह्य़ातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मदतीचे आवाहन केले होते. आयुक्तांच्या या आवाहनाकडे जिल्ह्य़ातील बहुतांश गणेश मंडळांनी पाठ फिरवली. शंभराहून अधिक सार्वजनिक मंडळे असलेल्या जिल्ह्य़ातून केवळ तीन आणि मुंबईतून एका मंडळाकडून झालेल्या सुमारे एक लाख २० हजार रुपयांच्या मदतीतून जिल्ह्य़ातील २९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली आहे.

बाप्पाच्या आगमनास अवघे काही तास उरले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे आकारास येत असताना प्रत्यक्षात मंडळांच्या सामाजिक बांधिलकीचा अनुभव धर्मादाय आयुक्त घेत आहेत. जुलै महिन्यात आयुक्तांनी आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग निर्धोक व्हावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे देणगी स्वरूपात जमा होणारा निधी, देणगीतील काही रक्कम ही गरजू विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे प्रदान करण्याचे आवाहन केले होते.

जिल्ह्य़ात शंभरपेक्षा अधिक सार्वजनिक मंडळे उत्सव दणक्यात साजरा करता यावा यासाठी महापालिका, नगरपालिका प्रशासनासह पोलिसांकडे वेगवेगळ्या परवानग्यांसाठी फेऱ्या मारत आहेत. उत्सवाची धामधूम जपण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाकडे कानाडोळा केला.

शहरातील रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ (चांदीचा गणपती), आनंदवली येथील नवश्या गणपती आणि एकलहरा येथील औष्णिक वीज केंद्र प्रकल्पातील सार्वजनिक गणेश मंडळाने आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. या तीनही मंडळांकडून जमा झालेले रुपये २७,५०० तसेच मुंबईच्या लालबाग राजाकडून आलेले एक लाख रुपये याप्रमाणे एकूण एक लाख २७ हजार ५०० रुपयांतून जिल्ह्य़ातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली. सहधर्मादाय आयुक्त प्रदीप घुगे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात २९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. गणेशोत्सव काळात मंडळांनी आपल्याकडे देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या निधीचा योग्य विनिमय करावा, असे आवाहन सहधर्मादाय आयुक्त घुगे यांनी केले आहे.

गणेश मंडळांनी मदतीसाठी पुढे यावे

जिल्ह्य़ात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. लवकरच गणेश उत्सवाला सुरुवात होईल. या उत्सव काळात सजावट, गणेशमूर्ती, गीत-संगीत यावर अधिक खर्च न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा. बचत झालेली रक्कम जर गरजू विद्यार्थ्यांना दिली तर अनेकांना त्याचा लाभ होईल. यासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेत आदर्श निर्माण करावा.   – प्रदीप घुगे, सहधर्मादाय आयुक्त