News Flash

औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा!

शहर व ग्रामीण भागातील बहुतांश शाळा गुरूवारपासून सुरू झाल्या.

नाशिक शहरात विद्यार्थी वर्गात येताना.

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर प्रथमच बच्चे कंपनीच्या किलबिलाटात शाळेत घंटा वाजली आणि नव्या शैक्षणिक वर्षांचा उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशा करण्यात आला. रंगीबेरंगी पाटय़ा, आकर्षक रांगोळी, प्रवेशद्वारावर तोरणाने सजलेल्या शाळांमध्ये कुठे औक्षण तर कुठे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वातावरणात गडबडले ते पूर्व प्राथमिकचे चिमुरडे. पालकांचा हात सोडून वर्गात जाताना कित्येकांना रडू कोसळले. या वर्गातील शिक्षकांचा पहिला दिवस संबंधितांना शांत करण्यात गेला.

शहर व ग्रामीण भागातील बहुतांश शाळा गुरूवारपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी स्वच्छता,  वर्गात आकर्षक सजावट करण्यात आली. आकर्षक रांगोळी व प्रवेशद्वारावर फुल व पानांचे तोरण लावण्यात आले. काही शाळांनी बच्चे कंपनीला खुष करण्यासाठी कार्टून्सच्या पेहेरावातील मंडळींनाही पाचारण केले. नवे दप्तर, नवी पेन्सील व डबा

घेऊन दाखल झालेल्या विद्यार्थी शाळेतील नवलाईने चकीत झाले. प्राथमिक शाळांमध्ये बालकांचे औक्षण करत त्यांना गुलाब पुष्प, चॉकलेट देण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पालकांनी नवा वर्ग, शिक्षक यांची ओळख व्हावी, यासाठी पाल्यासमवेत शाळेत जाणे पसंत केल्याने गर्दीत भर पडली. पहिल्या दिवशी अभ्यास तसा झालाच नाही. नवीन वर्गात नवीन शिक्षक आणि मित्र यांची ओळख करून घेत सुटीतील धमाल यावर चर्चा रंगली. जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेत अशीच जय्यत तयारी करण्यात आली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती वह्या-पुस्तके मिळावीत यासाठी आधी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी त्याचे वितरण झाले. शासकीय कन्या विद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

माई लेले श्रवण विकास विद्यालयात प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही काळ मैदानात नेण्यात आले. मुलांना सुटी कशी गेली, सुटीत कोणी काय केले, नवीन काय काय झाले, सुटीतील स्पर्धा परीक्षांचे निकाल, उन्हाळी शिबीर याबद्दल शिक्षकांनी एकत्रित संवाद साधला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुलांनी सुटीतील गमतीजमती कथन केल्या. प्राथमिक-माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वातावरण सरावाचे असते. नव्या वर्षांत अभ्यास कसा करायचा, मागे कोण राहिले, वर्गात नवीन कोण, वह्य़ांसह व्यवसाय, पुस्तके आदींबाबत चर्चा झाली. काही शाळांनी मन एकाग्र होण्यासाठी संस्कृत श्लोक विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतले. त्या श्लोकांचा मराठी अर्थ समजावून देण्यात आला. वर्षभर शाळेचे अध्ययन व अध्यापक प्रक्रिया चांगली होण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांसाठी वर्षांरंभ उपासना कार्यक्रम घेण्यात आला.

शाळेचा पहिला दिवस गाजवला तो पूर्व प्राथमिकच्या चिमुकल्यांनी. शाळेतील वातावरण त्यांच्यासाठी नवीन होते. पालकांना सोडून वर्गात जाण्यास काही जण तयार नव्हते. आसपासच्या मुलांचे भांबावलेले चेहेरे पाहून त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. या गोंधळात काही जण मात्र शांतपणे वर्गात बसून होती. काही चिमुकले वर्गात जायचे नाही, असा निश्चय करत पालकांची पाठ फिरल्याबरोबर त्यांच्या मागे निघाले. या सर्वाची समजूत काढताना शिक्षकांची दमछाक झाली. मुलांचे रडणे पाहुन पालकांची घालमेल सुरू होती. मात्र त्या शिवाय पर्याय नसल्याने शालेय कर्मचाऱ्यांनी पालकांना बाहेर जाण्याची विनंती केली. काही पालक शाळा सुटेपर्यंत बाहेर थांबून राहिले. दरम्यान, ग्रामीण भागात मुलांना नियमित शाळेत पाठवा यासाठी पदयात्रा काढण्यात आली. बहुतांश शाळांमध्ये प्रभातफेरी, मोफत पुस्तक वितरण, बालगीतांसह देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची करमणूक व्हावी, यासाठी काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 2:04 am

Web Title: educational years started
Next Stories
1 मतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र
2 ५० टक्के लोकांमध्ये धोकादायक व्रण
3 भावली धरण पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार
Just Now!
X