सुरगाण्यात सर्पमित्र म्हणून ओळख

नाशिक : शेतकऱ्यांकडून सापाला मारले जाऊ नये म्हणून जिल्ह्याच्या आदिवासी भागात  सापांच्या संवर्धनासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनाच सर्पमित्र म्हणून काम करावे लागत आहे. सुरगाणा हा ९९ टक्के आदिवासी तालुका आहे. या तालुक्याची भौगोलिक रचना दऱ्याखोऱ्यांनी, सह्यद्री पर्वताच्या डोंगर रागांनी वेढलेली आहे. तालुक्यात बहुतांश प्रमाणात घनदाट जंगल आहे. पावसाळ्यात भरमसाठ कोसळणाऱ्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या असलेला हा तालुका निसर्गसौदर्यांने नटलेला आहे.

अशा जैव विविधतेने नटलेल्या परिसरात सापांचे प्रमाण जास्त असून साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे येथील आदिवासी बांधवांना पटवून देण्यासाठी सुरगाणा येथील वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे अनेक वर्षांपासून सापांची ओळख करून देत आहेत. गावात किंवा परिसरात साप निघाल्यास हा अधिकारी त्या ठिकाणी पोहचतो आणि सापाची सुटका करून पुन्हा जंगलात सोडून देतो. आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त सापांची त्यांनी अशा प्रकारे सुटका के ली आहे.

जोपळे यांचे मूळ गाव कळवण तालुक्यातील आमदर आहे. लहानपणापासून त्यांना सापांचे आकर्षण होते.आठवीमध्ये असतानाच त्यांनी साप पकडण्यास सुरुवात के ली होती.

लहान असतांना आई—वडील कामाला गेल्यावर लहान भावाला सांभाळण्याची जबाबदारी जोपळे यांच्यावर होती. एकदा लहान भाऊ सापाच्या पिलाशी खेळत असतांना त्यांनी तो साप त्याच्यापासून दूर केला. ते पिलू नागाचे होते. तेव्हांपासून

त्यांनी साप पकडण्यास सुरूवात के ली. साप पकडतांना प्रथमोपचार पहिले शिकणे आवश्यक असल्याचे ते  सांगतात. या परिसरात सापांना मारले जात असे. परंतु, जेव्हांपासून जोपळे आले. तेव्हांपासून साप दिसल्यावर न मारता ग्रामस्थ त्यांनाच बोलावतात. कुणीही साप मारत नाही. अनेक गावांगावांमध्ये जाऊन हे अधिकारी सापांविषयी जनजागृती करतात. त्यांची पत्नी कोल्हापूरमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी आहे. या तालुक्यात आदिवासींपैकी कोकणा ही जमात बहुसंख्येने आहे.

त्याखालोखाल हिंदू महादेव कोळी ,वारली ,हरिजन आणि चारण आदी जमातीदेखील आढळतात . नागली,भात, वरई, तूर, उडीद आणि कुळीथ ही प्रमुख पिके आहेत. सह्यद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरूवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळा रांग असे म्हणतात. या सातमाळा रांगेत काही गडकिल्ले आहेत. सुरगाणा तालुक्यातील केम या १५०० मीटर उंचीच्या डोंगरातून नार, पार, गिरणा या प्रमुख नद्या उगम पावतात.

अनेक वर्षांपासून मी साप पकडतो. सापांविषयी या परिसरात अनेक गैर समजुती आहेत. त्या दूर करण्याचा मी प्रयत्न केला. सापांची ओळख ग्रामस्थांना करून दिली. अनेक साप मी गावात जाऊन पकडले आहेत. जनजागृती करून साप वाचविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात.

-संदीप जोपळे (वन परिक्षेत्र अधिकारी, सुरगाणा)