आठवा नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १७ ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी सहा वाजता विश्वास लॉन्स येथे महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, राजू पार्सेकर, अभिनेत्री रेणुका शहाणे आदी उपस्थित राहणार आहेत.

याबाबतची माहिती महोत्सवाचे आयोजक मुकेश कणेरी यांनी दिली. उद्घाटन सोहळा सावरकरनगर येथील विश्वास लॉन्समध्ये होणार आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. महाजन बंधू तसेच ‘कोती’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुहास भोसले, टु माऊंट हाऊस या बालचित्रपटाचे दिग्दर्शक सुमन गांगुली यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तसेच शहाणे यांच्या ‘आठवण’ या चित्रपटाचा ‘वर्ल्ड प्रीमियर’ होणार आहे. आरती नागपाल यांची ‘आय थॉट आय सर्वाव्हड’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. तीन कलर्स या इराणियन निर्मात्याच्या ‘मुझेन तारिन’ या चित्रपटाचा प्रीमियर होईल. नाशिकच्या सुहास भोसलेंच्या ‘कोती’, ‘यारो समझा करो’, ‘भो-भो’, ‘असे हे फुलपाखरू’, ‘एक उडान हौसलो भरी’चे प्रोमो दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय प्रोमो, प्रीमियरनंतर मुकेश कणेरी यांच्या मल्लखांब चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. या वेळी मुंबईतील समर्थ व्यायाम मंदिर संस्थेमधील उदय देशपांडे व डॉ. नीता तारके यांच्यामार्फत मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.

उद्घाटन सत्रानंतर सर्व कार्यक्रम शुक्रवार ते रविवार या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक परिसरात होतील. शुक्रवारी नाशिक येथील दिग्दर्शकांनी तयार केलेले लघुपट सादर होतील.

त्यात गोदावरीचे भविष्य हे आपले कर्तव्य, व्हॉट नेक्स्ट, यादें, शिक्षा, सिग्नल, फिल्म मेकर, डेड एन्ड, दी लाफ्टर जर्नी आदींचा समावेश आहे. सायंकाळच्या सत्रात राजू पार्सेकर यांचा ‘पोलीस लाईन- एक पूर्ण सत्य’ मराठी चित्रपट, शनिवारी सायंकाळी सुहास भोसले यांचा ‘कोटी’ तसेच रविवारी ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चित्रपट दाखविण्यात येईल.

महोत्सवाचा समारोप रविवारी चार वाजता होणार असून यामध्ये चित्रपटाचे नॉमिनेशन आणि इतर घोषणा करण्यात येतील.

महोत्सवाचे आकर्षण ‘मोबाइल फिल्म डोम’

महोत्सवात पहिल्या दिवशी विश्वास लॉन्स येथे आणि नंतर कुसुमाग्रज स्मारक परिसरात रशियन अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित ‘मोबाइल फिल्म डोम’ लावण्यात येणार आहे. ९ मीटर परिघाच्या चित्रपटगृहात चार, पाच प्रोजेक्टरच्या मदतीने चित्रपट पाहाण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. रशियन चित्रपटांसोबत मराठी चित्रपट काही शुल्क आकारून नाशिककरांना पाहता येणार आहेत.