आठ दुकानांचे नुकसान; तीन कामगार जखमी

खून, हाणामाऱ्या व तत्सम कारणांनी नेहमी चर्चेत असणारा तिबेटीयन बाजाराचा परिसर शनिवारी पहाटे जोरदार स्फोटाने हादरला. त्यात आठ दुकानांचे नुकसान होऊन तीन कामगार जखमी झाले. सिलिंडरच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्या गाळ्यात ही घटना घडली, तेथील आठ सिलिंडर सुरक्षित राहिल्याने गूढ वाढले असून पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

शरणपूर रस्त्यावर महापालिकेने उभारलेला तिबेटीयन बाजार आहे. या भागात चायनीज व तत्सम खाद्य पदार्थाची दुकाने लागतात. याच ठिकाणी चांगदेव पालवे यांचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे. रात्री कामे आटोपल्यावर त्यांनी गॅस सिलिंडर, शेगडी दुकानात ठेवल्याचे सांगितले जाते. पहाटे साडे पाचच्या सुमारास त्यांच्या दुकानात स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, आसपासच्या दुकानांचे प्रचंड नुकसान झाले. काही भिंतीना भगदाड पडले. अनेक दुकानांवरील पत्रे उडून गेले. लोखंडी शटर तुटले. यावेळी दुकानाचे छप्पर कोसळून तीन कामगार जखमी झाले. आसपासच्या इमारतींमधील खिडकींच्या काचाही फुटल्या. स्फोटाची माहिती पोलिसांना तासाभराच्या विलंबाने देण्यात आली. या काळात घटनास्थळावरील काही पुरावे नष्ट केले गेले की काय, याची छाननी सुरू आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही स्फोटक वा तत्सम वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तसे आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले. शेगडीला लावलेल्या सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविला गेला. मात्र, याच गाळ्यातील सिलिंडर सुरक्षित असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दरम्यान, तिबेटीयन बाजारात यापूर्वी खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणहून कोटय़वधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुन्हेगारांचा या परिसरात वावर असतो. स्फोटाची घटना घडली, त्याच दिवशी दुपारी टोळक्याने धुडगूस घालत खाद्य पदार्थाच्या दुकानांची तोडफोड केली. या घटनाक्रमामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. स्फोट प्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल दुकान मालक पालवे याच्याविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा स्फोट सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे झाला की अन्य ज्वालाग्राही पदार्थामुळे याची छाननी करण्यासाठी बाहेरील पथकाला बोलावण्यात आले आहे.

प्रथमदर्शनी सिलिंडर गळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज आहे. चौकशीसाठी बाहेरूनही विशेष पथक बोलाविले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना तासाभराच्या विलंबाने कळविण्यात आली. त्यामागील कारणे तपासून पाहिली जात आहे.

– डॉ. रवींद्र कुमार सिंगल (पोलीस आयुक्त, नाशिक)