20 January 2019

News Flash

सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आठवे गाव टंचाईमुक्त

आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियानमध्ये आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले आहे.

हेदपाडा पाणी प्रकल्पाचा शुभारंभ करताना महिला. समवेत खा. विनय सहस्रबुद्धे, प्रमोद गायकवाड आदी.

हेदपाडय़ावरील पाणी प्रकल्पाचे उद्घाटन

सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियानमध्ये आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायतअंतर्गत हेदपाडा या पाडय़ावरील पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यसभेचे खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते नळ सुरू करून पाणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

शहरातील तरुणांनी समाजमाध्यमांवर एकत्र येऊन लोकसहभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीने जिथे गाडी पोहोचू शकत नाही, भ्रमणध्वनीचा संपर्क नाही, अशा अतिदुर्गम भागातील आठ गावांना टँकरमुक्त करावे ही समाजमाध्यमाच्या इतिहासातील एकमेव घटना असल्याचे प्रतिपादन यावेळी सहस्रबुद्धे यांनी केले. फोरमचे काम बघून पुढील प्रकल्पांमध्ये शासकीय स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हेदपाडय़ाला जाण्यासाठी असलेला चार किलोमीटरचा रस्ता खराब असल्याने पाइप, सिमेंट, रेती या वस्तू पोहोचवणे अशक्यप्राय होते. या स्थितीत गावातील माय-भगिनींच्या डोक्यावरील हंडय़ांचा भार उतरवण्यास फोरमचे पथक पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.

भारती विद्यापीठातील एमबीबीएसच्या १९९५ च्या तुकडीतील माजी विद्यार्थी, रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट, ग्रामपंचायत तोरंगण, पेसा निधी, सोशल नेटवर्कर्स आणि गावकऱ्यांचे श्रमदान यांचे विशेष सहकार्य या उपक्रमास मिळाले. यावेळी सोशल नेटवर्किंग फोरमचे डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, डॉ. जयदीप निकम, डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांच्यासह तोरंगण, हेदपाडा परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर ग्रामसेवक सचिन पवार यांनी आभार मानले.

कमी खर्चात, शाश्वत पाणी

दुष्काळग्रस्त गावांचा अभ्यास करताना अनेक गावांना शासनाच्या माध्यमातून काही ना काही काम झाले आहे. तथापि, कधी भ्रष्टाचार, कधी चुकीचे निर्णय तर बरेचदा पाण्याचे कायम स्रोत शोधणे शक्य न झाल्याने या पाणी योजना अपयशी ठरल्या. मात्र या अपूर्ण योजनांमधील वापर न केलेली जलवाहिनी, विहीर किंवा पाण्याची टाकी यातील काही भाग शिल्लक असतो. अशा उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून संस्थेचे तंत्रज्ञ, लोकसहभागातून निधी आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून कमीत कमी खर्चात दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने जे तंत्र विकसित केले आहे ते आता ‘एसएनएफ पॅटर्न’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या पद्धतीतून हेदपाडा हे पाण्यासाठी स्वयंपूर्ण होणारे आठवे गाव ठरले आहे.

हेदपाडय़ाची कथा

हेदपाडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण-त्र्यंबक ग्रामपंचायतमधील दुर्गम भागातील आदिवासी पाडा. या गावची कहाणीच मुलखावेगळी आहे. इथे उन्हाळ्यात दीड किलोमीटर अंतरावरील दरीत असलेल्या विहिरीत पाणी मिळते. पाऊस प्रचंड पडूनही पावसाळ्यात पाण्यासाठी चिखल तुडवत रानातील झिऱ्यांमध्ये फिरावे लागते. पायवाटेवरचे खड्डे, खोल दरीतली विहीर आणि पावसाळ्यात पाण्यासाठीची जीवघेणी कसरत फोरमच्या पथकाने पाहिली. खड्डे पार करून दीड किलोमीटर पायवाटेवरून गावात डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणाऱ्या महिला बघितल्या. गावकऱ्यांशी चर्चा केली आणि हेदपाडय़ाचा पाणीप्रश्न त्वरित सोडवण्याचा निर्णय सोशल नेटवर्किंग फोरमने घेऊन सुरू केलेले काम पूर्णत्वास नेले.

First Published on January 9, 2018 2:34 am

Web Title: eighth village free from water scarcity through social networking forum