News Flash

गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी

इंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन येथे राहणाऱ्या शोभना जोशी या गुरुवारी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या.

इंदिरानगरसह नाशिक शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे गायींचा रस्त्यावर वावर असतो

सकाळच्या वेळी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी जाणे इंदिरानगर परिसरातील वृध्द महिलेला महागात पडले. मोकाट गायींच्या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून या महिलेची सोडवणूक करण्यासाठी परिसरातील नागरिकांना गायींना मार देऊन पिटाळावे लागले. वृद्ध महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महापालिका मात्र याबाबत बघ्याच्या भूमिकेत आहे.

इंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन येथे राहणाऱ्या शोभना जोशी या गुरुवारी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या. सकाळी साडेसात वाजता त्या निरंजन पार्क येथील र्मचट बँकेसमोर आल्या असता रस्त्यावर पाच ते सहा गायी ठिय्या देऊन तर काही उभ्या होत्या. अचानक गायींच्या जवळ असणारे वासरू उधळले. त्याने जोशी यांना धक्का दिला. या धक्क्य़ाने त्या खाली पडल्या. उठून उभे राहत नाही तोच अन्य गायींनी त्यांच्यावर हल्ला केला. पायांनी तसेच शिंगाने त्यांना जखमी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी शिंग खुपसत त्यांना जायबंदी केले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यावर परिसरात राहणाऱ्या सुधीर पाऊल, प्रवीण खरात, अजय खरात, कल्पेश सोनवणे, राहुल विंचूरकर यांनी दगड मारत, तर कोणी काठय़ांनी मार देत गायींना पिटाळण्याचा प्रयत्न केला. पंधरा मिनिटानंतर गायींना हुसकाविण्यात त्यांना यश आले. युवकांनी प्रसंगाचे गांभिर्य ओळखत अंगावरील कपडे काढत जखमी जोशी यांच्या अंगावर ठिकठिकाणी बांधत रक्तस्त्राव रोखण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोनवणे यांनी रुग्णवाहिका पाठवित जखमी जोशी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केवळ इंदिरानगरच नव्हे, तर शहरातील अनेक भागात रस्त्यावर ठाण मांडलेली जनावरे दिसतात. दहीपुलावर तर कायमच गायींचा वावर असतो. त्यांच्या घोळक्यातूनच वाहनधारकांना रस्ता काढावा लागतो.

महापालिका केवळ बघ्याच्या भूमिकेत

इंदिरानगर परिसरात अनेक ठिकाणी गोठे आहेत. मालक जनावरांना मोकाट सोडतात. या मोकाट जनावरांची योग्य पद्धतीने देखभाल होत नाही. याबाबत गोठेमालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. महापालिकेला गायी कोणाच्या मालकीच्या आहेत, याची माहिती असून संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. महापालिका याबाबत बघ्याच्या भूमिकेत आहे. गुरुवारच्या प्रकरणात पहिल्यांदाच आरोग्य विभागाने याबाबत गोठे मालक चव्हाण आणि रंगरेज यांना नोटीस बजावली. मोकाट जनावर तसेच गोठे मालकांबाबत ठोस कारवाईची अपेक्षा आहे.

सचिन कुलकर्णी

ठेकेदार संस्थेला दोन वर्षांचे मानधन नाही

सिडको प्रभागात मोकाट जनावरांचा देखभाल करण्यासाठी महापालिकेने गौरव क्षत्रिय यांच्या ‘आवास’ या संस्थेला जबाबदारी दिली आहे. आवासच्या वतीने मोकाट जनावरांची योग्य ती देखभाल होत आहे. परंतु, दोन वर्षांपासून महापालिकेने आवासला एक पैसाही न दिल्याने जनावरांच्या देखभालीत अडचण येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने तसेच प्रसंगी पदरमोड करत संस्थेचे काम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:37 am

Web Title: elderly women seriously injured in cows attack
Next Stories
1 ड्वेन ब्राव्होच्या ‘रन द वर्ल्ड’ मध्ये नाशिकचा सचिन खैरनार
2 नोटा छपाई नेहमीच्याच गतीने
3 शालेय वाहतूक सुरक्षित होणार
Just Now!
X