महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या २०१५-१६ वर्षांसाठी विद्यापीठ विद्याथी परिषदेची स्थापना करण्यात आली. या अधिसभेसाठी विद्यार्थी प्रतिनिधींची अविरोध तर विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांची निवडणूक शांततेत पार पडली. आरोग्य विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यार्थी परिषदेतून तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात संगमनेरच्या एमएचएफ होमिओपॅथी महाविद्यालयाचा मोह. अझहरुद्दिन जैन्नुद्दीन शेख, चंद्रपूर येथील विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालयाचा जतीन लेंगुरे आणि नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा गणेश मराठे यांचा समावेश आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी आर. टी. आयुर्वेद महाविद्यालयाची (अकोला) पूजा डांगरे, उपाध्यक्षपदी अहमदनगरच्या यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाची सायली पाटील आणि पुणे येथील संचेती इन्स्टिटय़ुटची स्नेहा मोरे, सचिवपदी नागपूरच्या ऑक्युपेशनल थेरपी स्कूल शासकीय महाविद्यालयाची जयश्री पराते आणि सहसचिवपदी लातुरच्या महाराष्ट्र इन्स्टिटय़ुट ऑफ नर्सिग सायन्सेसचा शैलेश सूर्यवंशी आदींची निवड झाली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी या नावांची घोषणा केली. कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.