पावसाळ्यात सावधानता बाळगण्याचे महावितरणचे आवाहन

पावसाळ्यात विजेमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ होते ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास ‘शून्य वीज अपघात’ हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. पावसाळ्यात नागरिकांनी वीज सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकण्याचे तसेच तारांवर झाड कोसळून किंवा झाडाची फांदी पडून विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. काही वेळा तुटलेल्या तारा ओलसर जमिनीवर पडून वीजप्रवाहाचा धक्का बसण्याचा धोका असतो. हे सर्व टाळण्यासाठी नागरिकांनी अशा तारांना स्पर्श करणे टाळावे व संबंधित लाइनमन अथवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयास कळवावे. घरातील विद्युत उपकरणे, विद्युत संच मांडणी व जोडणी, अर्थिग सुस्थितीत असल्याची खात्री परवानाधारक व्यक्तीकडून करून घेण्याची सूचना महावितरणकडून करण्यात आली आहे.

अचानकपणे गाव अथवा परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी महत्त्वाच्या कारणाशिवाय तत्काळ संबंधित उपकेंद्रास संपर्क करणे टाळण्याचा अजब सल्लाही महावितरणकडून देण्यात आला आहे. कारण या वेळेत उपकेंद्रचालक संबंधित लाइनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतो, दुरुस्तीच्या कामासाठी विद्युतपुरवठा चालू किंवा बंद करण्यासंदर्भात सूचनांचे आदान-प्रदान सुरू असते. घटनास्थळावरून एखादा ग्राहक उपकेंद्रचालकास घटना किंवा धोक्याबाबत सूचना देण्याचा प्रयत्न करीत असतो, असे महावितरणने म्हटले आहे.

विजेमुळे अपघात टाळण्यासाठी कशाप्रकारे दक्षता घ्यावी, यासंदर्भातही महावितरणकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार वीज उपकरणांचा पाण्याशी संपर्क टाळावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

शेतात जनावरे विजेच्या खांबास, तारांना तसेच विजेच्या खांबाजवळ अथवा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व अर्थिगची वायर ही अखंड असावी. पाऊस सुरू असताना विजेचा पंप चालू अथवा बंद करणे टाळावे. पाऊस सुरू असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीजतारांखाली थांबू नये. संभाव्य आपत्ती टाळण्याकरिता तत्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा महावितरणच्या चोवीस तास उपलब्ध मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १९१२ अथवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजेचा धोका

घरातील पाण्याच्या अर्थिगविरहित वीज मोटारीला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभव आहे. त्याचप्रमाणे कपडे वाळत घालण्यासाठी वीज खांब अथवा वीज प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधलेली तार (अशा वेळी कापड वा दोरी वापरावी), लोखंडी खिडकी, दरवाजा, जाळी, फ्रिज, कुलर, मिक्सर, इस्त्री, गिझर आदी विद्युत उपकरणे आदींमधून दुर्घटना घडण्याची भीती आहे.  ठिकठिकाणी जोडलेल्या वायर, विद्युत खांब, शेतात ओल्या हाताने मोटार सुरू करताना, तुटलेल्या वीज तारेचा स्पर्श, मोटारीसाठी वापरलेल्या आवरणरहित वायरचा स्पर्श, वाहनाच्या टपावर, मालवाहू ट्रक किंवा ट्रॅक्टरवर बसल्याने विद्युत तारांना स्पर्श होऊन अपघाताचा धोका असतो असे नमूद करण्यात आले आहे.

खबरदारीचे उपाय

पाणी हे वीज सुवाहक असून घरातील स्विच बोर्ड, विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यास धक्का बसण्याचा धोका असतो. ओलाव्याच्या ठिकाणी उपकरणे हाताळताना पायात रबरी चप्पल, बूट वापरावेत. घरातील ओले कपडे विजेची वायर व तारेवर वाळवण्यासाठी टाकू नये. काही बिघाड दिसल्यास तत्काळ मुख्य बटण बंद करावे. कोणाला विजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तीस थेट स्पर्श करू नये, त्याऐवजी कोरडय़ा लाकडाने त्याला बाजूला करावे आणि त्वरित रुग्णालयात न्यावे. घरात आणि शेतात अर्थिगमध्ये बिघाडाच्या कारणामुळेही अनेक अपघात होत असतात. त्यामुळे शेतातील व घरातील वीज उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी अर्थिग फार महत्त्वाची ठरते. परवानाधारक व्यक्तीकडून अर्थिग व वायरिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे. अर्थिग व वायरिंगमध्ये दोष आढळल्यास परवानाधारक व्यक्तीकडून त्यांची त्वरित दुरुस्ती करणे. घरात मुख्य बटण केंद्राआधी (मेन स्विच बोर्ड) ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर’ बसविणे. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांकरिता ‘थ्री फेज पिन’ आणि ‘सॉकेट’चाच वापर करणे. आयएसआय चिन्ह आणि योग्य दर्जा असलेल्याच विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणातर्फे करण्यात आले आहे.