News Flash

दिंडोरीमध्ये विद्युत मनोरा कोसळून तीन कामगार जखमी

वीज वाहून नेण्यासाठी पॉवरग्रिड कंपनीतर्फे अतिउच्च दाबाच्या वाहिनी उभारण्याचे काम सुरू आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड शिवारात शनिवारी दुपारी पॉवरग्रिड कंपनीचा विद्युत मनोरा कोसळून तीन कामगार जखमी झाले. ज्या वेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा उर्वरित १० ते १५ कामगार जेवणासाठी बाजूला गेले असल्याने मोठा अनर्थ टळला. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची सूचना केली आहे.

वीज वाहून नेण्यासाठी पॉवरग्रिड कंपनीतर्फे अतिउच्च दाबाच्या वाहिनी उभारण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यांत भलेमोठे मनोरे उभारले जात आहेत. या मनोऱ्यांसाठी जागा देण्यावरून आधीच वाद सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता हे काम पुढे रेटले जात असल्याचा आक्षेप आहे. अवनखेड शिवारातील गोटीराम मोरे यांच्या शेतात परप्रांतीय कामगारांकडून मनोरा उभारण्याचे काम सुरू होते. काही कामगार जेवणासाठी लगतच्या पडवीत निघून गेले. या वेळी यंत्राच्या साहाय्याने मनोरा उभा केला जात असताना तो कोसळला. त्याखाली तीन मजूर सापडले. मनोऱ्याचा आकार आणि वजन अवाढव्य असल्याने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. जखमींना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील अकबर इस्माईल आणि बिंदू सोरेन या कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती समजल्यानंतर खा. हरिश्चंद्र चव्हाण, तहसीलदार बाळासाहेब गाढवे, पोलीस अधिकारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी या घटनेची सखोल चौकशी करण्याची सूचना चव्हाण यांनी प्रशासनाला केली. शेतांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या अवाढव्य मनोऱ्यांना शेतकरी विरोध करीत आहेत. या मनोऱ्यांचा धोका या घटनेतून समोर आल्याची प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 1:30 am

Web Title: electrical tower collapse in nashik
Next Stories
1 अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची आत्महत्या
2 धुळ्यात ७४ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’
3 पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या तीन संशयितांना अटक
Just Now!
X