23 November 2017

News Flash

नाशिक लवकरच वीज अपघातमुक्त शहर

घराच्या अतिशय जवळून जाणाऱ्या वीज तारा भूमिगत करण्याची मागणी वारंवार होत आहे.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: September 14, 2017 2:56 AM

ऊर्जामंत्र्यांची घोषणा

शहरातील अपघातप्रवण ठिकाणे शोधून हा धोका हटविण्याची योजना सरकारने आखली आहे. उघडय़ावरील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचाही त्यात अंतर्भाव आहे. पुढील काळात नाशिक शहर वीज अपघातातून मुक्त होणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मात्र, काही चांगल्या कामांसाठी दीर्घ काळ लागतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

नाशिकमधील इच्छामणी मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित १० वीज उपकेंद्राचे लोकार्पण व सात वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आ. बाळासाहेब सानप व सीमा हिरे, जयंत जाधव, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे आदी उपस्थित होते. आ. हिरे व आ. जाधव यांनी शहरातील प्रश्न यावेळी मांडले. गेल्या काही वर्षांत शहरात वीज अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. उघडय़ा वीज तारांमुळे सिडको परिसरात अनेक अपघात घडले आहेत. घराच्या अतिशय जवळून जाणाऱ्या वीज तारा भूमिगत करण्याची मागणी वारंवार होत आहे.

अपघात प्रवण ठिकाणे शोधण्यासाठी सर्वेक्षण करून काम करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. नाशिक शहर व जिल्ह्यातील वीज समस्या सोडविणे व नवीन यंत्रणा बसविणे आदी कामांसाठी शासनाने ५५० कोटी रुपये दिले आहेत. ही कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होतील. आगामी काळात २०३० पर्यंत नाशिकची विजेची गरज लक्षात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी शासन आराखडा बनवत आहे. जनतेसह उद्योगांनाही वीज कमी पडणार नाही, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महावितरण ही देशातील सर्वाधिक वीज वितरण करणारी कंपनी आहे. शेतीला शाश्वत व दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून राज्यातील ४० लाख शेतकरी सौर ऊर्जेशी जोडले जात आहे. नाशिक जिल्ह्यतील ४०० ते ५०० शेतकऱ्यांचा एक गट तयार करून संबंधितांना शेतातच वीज उपलब्ध केली जाईल, असे ते म्हणाले.

ग्राहकांना शाश्वत वीज देण्याची शासनाची भूमिका असून ग्राहक सेवा हीच महावितरणची जबाबदारी आहे. अभियंत्यानी प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहचावे व एकही ग्राहक अखंडित विजेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ग्राम विद्युत व्यवस्थापकामुळे ग्रामीण भागातील लाइनमनची अडचण दूर होईल. संबंधितांच्या नियुक्तीतून शाखा अभियंत्यांचे काम सोपे होईल. प्रत्येक अभियंत्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार असून ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, असा प्रयत्न आहे. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तक्रारींचा पाऊस

नाशिक येथे झालेल्या वीज ग्राहकांशी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्र्यांसमोर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. त्यात अधिकचे वीज देयक, नादुरुस्त रोहित्र, वीज पुरवळा सुरळीत नसणे, रखडलेली वीज जोडणी, कृषिपंपांची जोडणी तसेच औद्योगिक वीज ग्राहकांमधील वीज दराची तफावत दूर करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांविषयक तक्रारींचा समावेश होता. वीज ग्राहकांच्या जवळपास ४०० ते ४५० तक्रारी ऐकून घेत बावनकुळे यांनी त्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. धोरणात्मक विषयाशी निगडित प्रश्नावर आराखडा तयार करण्याचे आदेशही दिले. जवळपास सहा तास ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत त्या निकाली काढण्यात आल्या. तक्रारी मांडण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. जिल्ह्यात बागायती क्षेत्र मोठे असल्याने अनेक नागरिक शेत-शिवारात वास्तव्यास असतात. त्यांच्या घरात कायम प्रकाश उपलब्ध झाला पाहिजे, याच्यासाठी विशेष रोहित्र (एसडीटी) तसेच सिंगल फेज वीज व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी दिल्या. येवला तालुक्यात कित्येक वर्षांपासून सहा हजार ७०० शेतकरी वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास तात्काळ पाठवून संबंधितांना वीज जोडण्या देण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे त्यांनी सूचित केले. कंत्राटी कामगाराने त्यांच्यासह इतर पाच जणांना पाच महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याची तक्रार केली.

First Published on September 14, 2017 2:56 am

Web Title: electricity accident issue in nashik chandrashekhar bawankule