पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ

अतिउच्च दाबाच्या वीजवाहिनीकरिता मनोरे उभारण्याच्या कामात द्राक्ष बागांसाठी दाखविली जाणारी नुकसानभरपाई प्रत्यक्षात मोठी कपात करून दिली जात असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बाधित शेतकऱ्यांनी आत्मदहन अथवा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे पोलीस व प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे मनोऱ्यासाठी तोडलेल्या द्राक्ष बागेत बाधित २०० ते ३०० शेतकऱ्यांनी ठाण मांडून पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडले. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन संबंधितांची मनधरणी केली. मनोरे उभारण्याच्या कामात सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

योग्य ती नुकसानभरपाई मिळत नसल्याने कुटुंबासह आत्मदहन अथवा आमरण उपोषण करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी आधीच दिला होता. या पाश्र्वभूमीवर सकाळपासून निफाडचे तहसीलदार, दिंडोरीचे प्रांताधिकारी व पोलीस बंदोबस्त शिरवाडे वणी परिसरात तैनात करण्यात आला. वसंत गायकवाड यांच्या मनोऱ्यासाठी उखडलेल्या द्राक्ष बागेत सर्व शेतकरी जमा झाले.

निफाड व चांदवड तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे. ही वाहिनी अन्य मार्गे वळविण्यासाठी स्थानिकांनी आधीही आंदोलने केली होती, परंतु कंपनीने सर्वाचा विरोध मोडून काढत काम सुरू ठेवले. शेतकऱ्यांची परवानगी नसताना पोलीस यंत्रणेचा धाक दाखवून पंचनाम्यावर बळजबरीने स्वाक्षरी घेतली जाते. शेतकऱ्यांचा मनोरे उभारण्यास विरोध नसून नुकसानभरपाई देण्यात अवलंबिलेल्या प्रक्रियेवर संबंधितांचा आक्षेप आहे. कृषी व महसूलच्या अधिकाऱ्यांनी द्राक्ष बागाच्या नुकसानीपोटी ७३.८० पैसे प्रति किलो दर दिला जाईल, असे सांगितले होते. परंतु ही भरपाई देताना कपात करून प्रत्यक्षात हा दर केवळ १२ ते १५ रुपये दर मिळतो, असा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला.  ज्या जागेवर मनोरा उभा राहणार, त्या बाधित जागेसाठी कोणतीही भरपाई न देता केवळ पिकांची नुकसानभरपाई दिली जाते. पूर्वी द्राक्ष बाग लागवडीसाठी आलेला खर्चही त्यात धरला जात नाही. फळ धारणेपासून त्याची वयोमर्यादा तीन ते १५ वर्षे अशी धरली आहे. त्यात आधी द्राक्ष बागेसाठी केलेली मेहनत, उभारणीसाठी केलेली व्यवस्था, अँगल व तारा, बांबू यांचाही खर्च त्यात समाविष्ट केला जात नाही. शिरवाडे वणी येथील वसंत गायकवाड यांची अडीच एकर द्राक्ष बाग याच पद्धतीने उघडण्यात आली. निर्यात द्राक्षाचे दर मिळवून देऊ असे तोंडी सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली. ही रक्कम प्रत्यक्षात केवळ १२ ते १५ रुपये किलोने हाती पडणार आहे. बागेसाठी घेतलेले १२ लाखांचे कर्ज डोक्यावर आहे. बाग तोडल्याने नवीन बाग उभारण्यासाठी खर्च आणि तीन वर्षे हाती उत्पन्न येणार नाही. या स्थितीत नुकसानभरपाईपोटी केवळ १५ ते १६ लाख रुपये मिळणार आहे. त्यातून कर्ज फेडणार की नव्याने बागेची उभारणी करणार, हा प्रश्न असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांनी निफाड तालुक्यात धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. अनिल कदम उपस्थित होते. भरपाईबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. त्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. प्रशासनाच्या आश्वासनावर समाधानी नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.