20 February 2019

News Flash

वीज पुरवठा खंडित झाल्याने शेकडो लघू उद्योग ठप्प

सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक त्रस्त

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक त्रस्त

सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सुमारे शेकडो लघू उद्योजकांना बसली. माळेगाव वसाहतीतील काही भागात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यामुळे लघू उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला. महत्वाची बाब म्हणजे, या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी निमा संघटनेचे पदाधिकारी आणि उद्योजक प्रयत्न करत असताना महावितरणकडून प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा प्रतिसाद मिळाला तेव्हा तपासणी केल्याशिवाय वीज पुरवठा पूर्ववत होणार नसल्याचे सांगून वेळ निभावून नेण्यात आली. तीन महिन्यांपासून सातत्याने हे प्रकार घडत असल्याची तक्रार केली जात आहे.

जिल्ह्य़ात सिन्नर तालुक्यातील माळेगाव ही महत्वाची औद्योगिक वसाहत आहे. परिसरात बडय़ा कारखान्यांसह शेकडो लघू उद्योग कार्यरत आहेत. वीज पुरवठय़ात काही तांत्रिक दोष उद्भवल्यास जनरेटरची सुविधा नसलेले लघू उद्योजक प्रामुख्याने भरडले जातात, याकडे निमाच्या सिन्नर उर्जा समितीचे प्रमुख बबन वाजे यांनी लक्ष वेधले. मोठय़ा कारखान्यांकडे जनरेटरची सुविधा आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होत नाही. लघू उद्योग महावितरणच्या वीज पुरवठय़ावर सर्वस्वी अवलंबून असतात. रविवारी कोणतीही कल्पना न देता माळेगाव औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरा काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला तर काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपापर्यंत पूर्ववत झाला नसल्याची तक्रार वाजे यांनी केली. यामुळे वसाहतीतील ३५० लघू उद्योगाचे कामकाज ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात उद्योजक महावितरण कार्यालयात संपर्क साधत होते. परंतु, कोणीही जबाबदार अधिकाऱ्याने दखल घेतली नाही. जवळपास २४ तासहून अधिक काळ वीज गायब असल्याने शेकडो उद्योगांना उत्पादन बंद ठेवत नुकसान सहन करावे लागले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत तीन महिन्यांपासून हे प्रकार घडत असून रविवारपासून वीज पुरवठय़ात समस्या निर्माण होऊ लागतात, असा उद्योजकांचा अनुभव आहे.

राज्यातील वीजदर आधीच अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने निमातर्फे विविध स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. त्यात भर म्हणजे असे प्रकार होत असल्यास ते उद्योगांच्या वाटचालीस मारक ठरणार असल्याचे निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी सांगितले.

केबलची वायर फिडरवर पडल्याने तांत्रिक दोष उद्भवल्याचे सांगितले. सोमवारी दुपारी तो दोष दूर करण्यात आला. औद्योगिक वसाहतीत सुरळीत वीज पुरवठय़ासाठी नवीन उपकेंद्र आणि जुने उपकेंद्र या दोन्ही केंद्रांतील पर्याय वापरता येईल, अशी समांतर व्यवस्था केली जात आहे. एखाद्या केंद्रात तांत्रिक दोष उद्भवल्यास लगेच दुसऱ्या केंद्रातून संबंधित ठिकाणी वीज पुरविण्याची समांतर व्यवस्था राहील. गेल्या शनिवारी नवीन, जुन्या उपकेंद्रातील दुरुस्ती, ऑईल बदलणे, सुटे भाग बदलण्याची कामे करण्यात आल्याचे महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वीज पुरवठय़ाबद्दल सिन्नर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे काम महावितरणने केलेले आहे. याबद्दल उद्योजक महावितरणच्या कामांची प्रशंसा करतात. शनिवारी देखभाल दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वीज वितरणात दोष उद्भवतात, याविषयी महावितरणपर्यंत तक्रार आलेली नाही.   -प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता, नाशिक शहर मंडळ

First Published on October 9, 2018 2:00 am

Web Title: electricity shortage in nashik 3