•   भाजप महापालिकेत सक्रिय
  •    विविध उपाय करण्याच्या सूचना

पावसाळ्यात शहरात पडलेले हजारो खड्डे नोव्हेंबरअखेर बुजविण्याचे निर्देश देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता शहरातील अस्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. अस्वच्छतेमुळे सार्वजनिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. घंटागाडय़ा सर्वत्र पोहचतील याची दक्षता, रामकुंडावर स्वतंत्र स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगारांना मूळ सेवेत रुजू करणे आदी उपाय योजण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छतेत नाशिकला राज्यात प्रथमस्थानी न्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

बुधवारी आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन स्वच्छता, घंटागाडी व्यवस्था, रुग्णालयातील औषधसाठा, धूर फवारणी आदींचा आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषधांची कमतरता हे नेहमीचे प्रश्न आहेत. दवाखान्यातून दिल्या जाणाऱ्या सुविधा, औषध साठा, घंटागाडी, औषध-धूर फवारणी आदींचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या.

मध्यंतरी डेंग्यू, मलेरियासह इतरही आजारांचे रुग्ण वाढत होते. त्यावर प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याची सूचना स्थायी सभापती उद्धव निमसे यांनी केली. जनजागृती करणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी, वेळोवेळी औषध, धूर फवारणी करण्याकडे लक्ष द्यावे. ज्या भागात डेंग्यूचे डास सापडले, तिथे दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली.

पेस्ट कंट्रोलचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पुरेसे सफाई कामगार नसल्याने हे काम योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे जे कर्मचारी, इतरत्र काम करत आहेत, त्यांना तातडीने मूळ विभागात रुजू करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरात नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. आरोग्य, वैद्यकीय विभागाने स्वच्छतेत नाशिक राज्यात प्रथम क्रमांकावर राहील, असे काम करावे. या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबदला देण्याचा विचार करण्यास सांगण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. जे. सोनकांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

घंटागाडय़ांविषयी तक्रारी कायम

रामकुंडासारख्या धार्मिक क्षेत्रासाठी स्वतंत्र स्वच्छता निरीक्षक नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली. घंटागाडीच्या तक्रारी लक्षात घेता संबंधित मक्तेदारांना निर्देश देऊन त्या घंटागाडय़ा तातडीने कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन फेरनियोजन करून घंटागाडय़ा सर्व ठिकाणी पोहचतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच पालापाचोळा संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी हातगाडय़ांची व्यवस्था गरजेची आहे.