नमुने घेऊन जाणारा कर्मचारी ऐनवेळी गायब, अहवला पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्याची वेळ

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक  : मालेगाव परिसरात करोनाचा वेगाने फैलाव होत असतांना संशयितांच्या नमुने तपासणीत कमालीचा गोंधळ उडत आहे. नमुने घेऊन जाणारा कर्मचारी ऐनवेळी गायब झाल्याने पालिका प्रशासनास पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घ्यावा लागला. पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवायचे अहवाल नागपूरला पाठविण्याची वेळ आली. अहवाल मिळण्यास होणाऱ्या विलंबासह अन्य अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने करोनाविरूध्दची लढाई जिंकायची कशी, असा प्रश्न महानगरपालिका प्रशासनास भेडसावत आहे.

जिल्ह्य़ात करोनाबाधितांच्या संख्येने ५०० चा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४२५ रुग्ण मालेगावमधील आहेत. एकटय़ा मालेगावमधील ५१४ अहवाल प्रलंबित आहेत. मालेगाव सामान्य रुग्णालय, मन्सुरा, जीवन रुग्णालय, फरहान रुग्णालय या ठिकाणी २२४ हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांसह बंदोबस्तावर तैनात राज्य राखीव दलाचे जवान, पोलीस यांनाही करोनाचा प्रादुर्भाव होत आहे. गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वेक्षण, विलगीकरण, प्रबोधनावर भर दिला जात असतांना प्रलंबित अहवाल महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. याआधी मालेगाव आणि नाशिकचे अहवाल पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. परंतु, पुणे प्रयोगशाळेवरील वाढता ताण पाहता धुळे येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत नमुने तपासणीस सुरूवात होताच मालेगावचे अहवाल धुळ्याला पाठविण्यात येतील अशी सूचना करण्यात आली.

दुसरीकडे, मालेगावमध्ये वेगाने रुग्ण वाढत असल्याने धुळे प्रयोगशाळेवरही ताण येण्यास सुरूवात झाली. परिणामी नाशिक, पुणे येथेही नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. सध्या दिवसभरात २०० हून अधिक नमुने तपासणीसाठी असतात. कधी हा आकडा ३०० पेक्षा पुढे जातो. यात पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांचाही समावेश आहे. धुळे प्रयोग शाळेवर ताण वाढलेला आहे.

नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची प्रतिदिन १८० नमुना तपासणीची क्षमता आहे. या ठिकाणी चार दिवसांचे अहवाल प्रलंबित आहेत. धुळ्याची क्षमता ९० असल्याने तेथून केवळ ५० अहवाल प्राप्त होतात. अहवाल मिळण्यात कालापव्यय होत असल्याने स्थानिक प्रशासनाने मुंबई येथील हाफकिन संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी केवळ ७० नमुना तपासणीची तयारी दर्शविली. अखेर पुणे प्रयोगशाळेने ३३० अहवाल तपासणी करणे मान्य केले असता नमुने घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याने असहकाराचे धोरण स्विकारले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.

दोन दिवसांपूर्वी नमुने घेऊन कर्मचारी पुण्याला जाणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने पुणे प्रयोगशाळेबरोबर चर्चा झाली. परंतु, नियोजित वेळी संबंधित कर्मचारी गायब झाला. घरी किंवा अन्य ठिकाणी तो न सापडल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने शोधाशोध करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने लोकप्रतिनिधींच्या नावे धमकी देण्याचा प्रयत्न केला. अखेर महापालिका उपायुक्तांनी कारवाईचा इशारा देत त्याला प्रामाणिकपणे काम करण्याची सूचना केली. या सर्व गोंधळात पुणे प्रयोगशाळेवर भार वाढल्याने हे नमुने नागपूरला पाठविण्याची वेळ आली. नागपूर येथील प्रयोगशाळेने दररोज २०० नमुने तपासणी करण्याचे मान्य केल्यावर कर्मचारी नमुने घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाला.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा त्याचे समुपदेशन करण्यात आले. आपले काम किती महत्वाचे आहे. आपण राष्ट्रीय काम करत असून सध्या आपत्ती काळात काम नेटाने करणे आपली जबाबदारी तसेच कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले. वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे मन वळविण्यात आल्याने अखेर तो काम करण्यास तयार झाला.