येवला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते पारदर्शी कार्यशैलीने ठेकेदारसह  विभागीय कर्मचारी  सध्या त्रस्त झाले आहेत. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थितांचा वर्ग घेत वेगवेगळ्या सूचना मुख्यधिकाऱ्यांकडून देण्यात येत असतात. कामातील सत्यांश पडताळून पाहण्यात येत असल्याने  त्यांच्या या कार्यशैलीने  ठेकेदारांसह सर्वच विभाग् मेटाकुटीस आला आहे.

दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांच्या नस्ती संथपणे पुढे सरकत आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बीना कुमार यांच्या कार्यकाळात नस्ती अडविण्यात आल्याची चर्चा झाली. तीच चर्चा आता डॉ. गीते यांच्या कार्यकाळात सुरू आहे. त्यामुळे गीते यांनी सर्वच नस्तींचा निपटारा करण्याचे ठरविले असून त्या अनुषंगाने त्यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारत दृक्श्राव्य माध्यमाव्दारे चर्चा करून ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना करत आहेत.

योजनेच्या कामात मोजमापमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधितांची हयगय केली जाणार नाही, असा इशारा गिते यांनी दिला आहे. उंच जलकुंभावर जाण्यासाठी शिडय़ा बसवितांना आवश्यक त्या तरतुदी करण्यात याव्यात, असे म्हणत त्यांनी तांत्रिक विभागाला धारेवर धरले. या अंतर्गत गुरुवारी करंजगावला भेट देत ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. प्लास्टिकबंदी स्पर्धेत सहभागी होणे, भेंडाळी ग्रामपंचायतमधील रोख पुस्तिका पूर्ण करणे आणि कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

ठेकेदारांमध्ये अस्वस्थता

पाणी पुरवठाच्या प्रलंबित असलेल्या सुमारे सहा कोटीच्या ७० नस्तीवरील अंतिम देयक वगळता इतर कामांना त्यांनी मंजुरी दिली. या नस्तींना का टाळले, अशी विचारणा होत असतांना प्रत्यक्ष कामांची पाहणी करत त्यावर निर्णय होणार असल्याचे गिते यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील दिंडोरी, वणी, गोळाखाल, बेरवाडी, त्र्यंबक आणि नाशिकमधील योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी योजनेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी पोहचते का, तसेच विहिरीच्या कामाचे, जलवाहिनीचे प्रत्यक्ष मोजमाप, पंपिंग यंत्रणेची  माहिती, सर्व कामाचे त्यांनी प्रत्यक्ष अवलोकन केले. त्यांच्या निर्णयामुळे देयके देण्यास विलंब होत असल्याने ठेकेदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.