मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव दरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरल्याने नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. शुक्रवारी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झालेली पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी येथे थांबवून माघारी वळविण्यात आली. परिणामी, नोकरदारांना सक्तीची रजा घ्यावी लागली. मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी, मनमाड-मुंबई राज्यराणी या एक्स्प्रेससह मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

भुसावळ-पुणे, जालना-दादर जनशताब्दी आणि भुसावळ-मुंबई पॅसेंजर मध्येच थांबवून माघारी पाठविली गेली. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलले गेले. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. मुंबईला निघालेल्या या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने अक्षरश: वाऱ्यावर सोडले. बसगाडय़ांची व्यवस्था न केल्याने त्यांना अनोळखी शहरात १० किलोमीटर अंतरावरील बस स्थानक शोधताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. याचा गैरफायदा स्थानिक रिक्षाचालकांनी उचलला आणि प्रवाशांची लूट केली.

कसारा येथील उंबरमाळी स्थानकालगत गुरुवारी रात्री सव्वा वाजता दुरुस्ती कामावेळी रेल्वेची व्हॅन रुळावरून घसरली आणि त्याचा फटका शुक्रवारी दुपापर्यंत भुसावळ, मनमाड, नाशिक ते मुंबई या मार्गावरील रेल्वे गाडय़ांना बसला. नोकरदारांची मुख्य भिस्त असणारी मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी येथून माघारी पाठविण्यात आली. नाशिकरोडवरून मार्गस्थ झाल्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस एक ते दीड तास देवळाली कॅम्प येथे थांबविण्यात आली. यावेळी तिचा पुढील प्रवास अनिश्चित असल्याची जाणीव झाली. यामुळे निम्म्याहून अधिक प्रवाशांनी देवळाली कॅम्पवरून घरी परतणे हिताचे मानले.

गणेश चतुर्थीच्या सुटीनंतर कामावर जाणाऱ्यांना सक्तीची रजा घ्यावी लागली. मार्गावरील सद्यस्थितीविषयी रेल्वेने देवळाली कॅम्प, नाशिकरोड स्थानकात सूचना देणे आवश्यक होते. तसे काही न करता प्रवाशांना वेठीस धरले, अशी तक्रार रेल्वे सल्लागार   समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी केली. केवळ पंचवटीच नव्हे तर नागपूर-मुंबई सेवाग्राम, भुसावळ-पुणे, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर या रेल्वे गाडय़ा वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून माघारी पाठविल्या गेल्या. तिथेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सेवाग्राम एक्स्प्रेसचा प्रवास खंडित करताना प्रशासनाने प्रवाशांना संलग्न बसची व्यवस्था करण्याचे औदार्य दाखविले नाही. नाशिकरोड रेल्वे स्थानक आणि मुंबईला बस सुटण्याचे महामार्ग बस स्थानक यामध्ये दहा किलोमीटरचे अंतर आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना ते माहिती असण्याची शक्यता नाही. नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्थानकावर मुंबईसाठी काही बसेसची व्यवस्था करता आली असती. परंतु, तसे काही न झाल्याने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी स्थानक शोधण्यापासून कसरत करावी लागली, याकडे फोकणे यांनी लक्ष वेधले.  या संदर्भात एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेल्वेकडून नाशिकरोड स्थानकाबद्दल बसची मागणी करण्यात आली नसल्याचे सांगितले. पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी येथे खंडित केली जाणार असल्याने इगतपुरी येथे तीन बसेसची मागणी केली गेली होती. परंतु, त्यातील केवळ एक बस प्रवाशांनी भरू शकली. ती इगतपुरीहून कल्याणला पाठविली गेल्याचे त्यांनी सांगितले.

मनमाडमध्येही प्रवाशांचे हाल

शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मनमाड-मुंबई दरम्यान रेल्वेची सर्व वाहतूक मोठय़ा प्रमाणावर ठप्प झाली. अनेक महत्वाच्या रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर लांब पल्लय़ाच्या गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले. मनमाड येथून सुटणारी मनमाड-मुंबई राज्यराणी, उत्तर महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी महत्वाची असलेली मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने ऐन गणेशोत्सव काळात हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात तिकीट, आरक्षणाचे पैसे परत देण्याची वेळ प्रशासनावर आली. प्रवाशांना माहिती आणि सूचना देण्यासाठी फलाट क्रमांक तीनवर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. या घटनाक्रमाने रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. मुंबई आणि भुसावळकडे जा-ये करण्यासाठी आलेल्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. आरक्षित प्रवाशांच्या परतावा घेण्याकरिता मोठय़ा रांगा लागल्या. गोदान एक्स्प्रेस कल्याण पुणे-दौंडमार्गे मनमाडला तर मुंबई-भुसावळ आणि भुसावळ-मुंबई या पॅसेंजर गाडय़ा रद्द केल्यानेही ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी अडचण झाली. परप्रांतातून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाडय़ा संथ जात असल्याने प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. प्रवाशांचा खोळंबा होऊ  नये म्हणून रेल्वेने अनेक गाडय़ांचे मार्ग बदलले तर काही गाडय़ा रद्द केल्या.