करोना महामारीचे जागतिक संकट सुरू असताना जिवाची पर्वा न करता कर्तव्य भावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्रांतर्गत कार्यरत आशा कार्यकर्ती मालुताई अहिरे यांनी बालकांना पोलिओ लसीकरणासाठी हातात साहित्य घेऊन नदीतून वाट काढत कर्तव्य बजावले.

कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या मालुताईंच्या कामाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतुक केले आहे. सहा महिन्यांपासून आशा आणि अंगणवाडीसेविका घरोघरी जाऊन करोना सर्वेक्षणाचे काम करत आहेत. करोना महामारीच्या काळात सर्वस्व पणाला लावून कर्तव्य बजावत आहेत. करोनाची साथ सर्व ठिकाणी सुरू असताना नाशिक जिल्ह्य़ात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. केवळ करोनाविषयक काम न करता नियमित लसीकरण, प्रसूतीवेळी देखभाल, प्रसूतीपश्चात सेवा अविरतपणे देत आहेत.

मालेगाव शहर आणि ग्रामीण भागात अर्धवार्षिक पल्स पोलिओ मोहीम रविवारी राबविण्यात आली. के ंद्रावर येऊ न शकलेल्या बालकांना घरी जाऊन पोलिओ लसीकरण देण्याचे काम आरोग्य कर्मचारी, आशा करत आहेत. तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्यां मालुताई अहिरे यांनी नदी वाहत असतानाही आरोग्यविषयक साहित्यासह नदी पार करत बालकांना पोलिओ लस देण्याचे काम केले. जिल्ह्य़ात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातही आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका आणि शिक्षक महत्त्वाचे योगदान देत आहेत.

प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. करोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडीसेविका काम करीत आहेत. आपले नियमित काम सांभाळून हे कर्मचारी करोनाविषयक कामही करत आहेत. आज बाहेर फिरणे धोक्याचे असताना धोका पत्करून या भगिनी समाजासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहेत. या सर्वाचे काम प्रेरणादायी असून बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातून वाट काढून कर्तव्य बजावणाऱ्या मालेगाव तालुक्यातील मालुताईंचा जिल्हा परिषदेला अभिमान असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले.