त्र्यंबक रस्त्यावरील प्रबोधिनीच्या मैदानावर प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत सोहळा

नाशिक : सरकारी अन् त्यातही शिस्तबध्द पोलीस दलातील नोकरीचे तसे सर्वाना आकर्षण. कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्यांना हे दल नेहमीच खुणावते. यामध्ये आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, कृषी आणि आयुर्वेदीकचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाईची भर पडली आहे. पोलीस दलास अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांचे कोंदण लाभल्याचे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत सोमवारी आयोजित दीक्षांत सोहळ्यात अधोरेखीत झाले.

त्र्यंबक रस्त्यावरील प्रबोधिनीच्या मैदानावर ११७ व्या सत्रात ६८८ प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दिमाखदार सोहळ्याने मुख्यमंत्री चकीत झाले. भाषणात त्यांनी अभूतपूर्व सोहळा, दिमाखदार संचलनाने थक्क झाल्याचे सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले. या सत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सरळसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते.

यामध्ये महाराष्ट्रातील ४७६ पुरूष, १९२ महिला प्रशिक्षणार्थी तसेच गोवा राज्यातील २० जणांचा समावेश आहे. पोलीस दलात दाखल झालेल्यांचे शिक्षण पाहिल्यावर संबंधितांनी वेगळी वाट पकडल्याचे दिसून येते. सर्वच क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. इतर शासकीय विभागात भरतीची प्रक्रिया थंडावल्याचे चित्र आहे. ही बाब देखील वेगळे शिक्षण असूनही अनेकांना पोलीस दलाकडे घेऊन गेली असावी. अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे यांनी प्रशिक्षणार्थीच्या शिक्षणाची माहिती दिली. या निमित्ताने ६६८ उपनिरीक्षक दलात दाखल झाले.

दीक्षांत सोहळ्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधिनीत नव्याने उभारल्या जाणारे सिंथेटिक ट्रॅक, अंतर्गत फायरिंग रेंज, अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी आणि फुटबॉल मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपसंचालक संजय मोहिते आदी उपस्थित होते.

 

पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा

प्रशिक्षणार्थीमध्ये २८९ कला क्षेत्रातील, १८२ विज्ञान, ६८ अभियांत्रिकी, ४९ वाणिज्य आणि उर्वरित कृषी, व्यवस्थापन, विधी आणि आयुर्वेदीक क्षेत्रातील असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्रात नेहमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा राहिला. या भागातील सर्वाधिक प्रशिक्षणार्थी आहेत. त्या खालोखाल मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाचा क्रमांक लागला.