अंध, अपंग व्यक्तींना चालविता येईल अशी स्मार्ट व्हील चेअर.. डोंगर उतारावरून खाली येणाऱ्या पाण्याला ‘पाणी आडवा पाणी जिरवा’मधून पाणीबचतीचा प्रयोग.. स्वयंचलित डी कोलर फेडरेशन.. पवन ऊर्जेचा आधार घेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर.. यासह विविध अनोखे आविष्कार ‘कर्मवीर एक्स्पो’ प्रदर्शनात पाहावयास मिळाले.
येथील क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्युत विभाग आणि आयटी लोकल नेटवर्क नाशिक यांच्यातर्फे आयोजित कर्मवीर एक्स्पो या स्पर्धात्मक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, विभागप्रमुख डॉ. बी. ई. कुशारे आदी उपस्थित होते. या वेळी श्रीवास्तव यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विशेषत: ऊर्जा व जल व्यवस्थापनावर विशेष संशोधन करून राष्ट्राची प्रगती करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले. कर्मवीर एक्स्पोसारख्या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा प्रदर्शनाचे १४वे वर्ष असून या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, अभियांत्रिकीच्या विविध संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणता याव्यात यासाठी याद्वारे प्रयत्न होत असल्याचे कुशारे यांनी सांगितले.
यंदा प्रदर्शनात १३९ गटांतील तब्बल ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात महाराष्ट्रासह कर्नाटक (१६), केरळ (४), मध्य प्रदेश (४), ओरिसा (४), आंध्र प्रदेश (१२) महाविद्यालयांनी सहभाग घेतला. प्रदर्शनात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाद्वारे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले. अपंग व्यक्तींना वेगवान पद्धतीने स्वयंचलित वाहन चालवता यावे यासाठी सौर ऊर्जेचा आधार घेत महावीर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रायसिकल’ तयार केली. जिचा वेग काही अंशी इंधनावर चालणाऱ्या वाहनांशी स्पर्धा करतो. त्यापुढील पाऊल संजीवनी महाविद्यालय पन्हाळाच्या विद्यार्थ्यांनी अंध, अपंग यांच्या शारीरिक व्यंगाचा विचार करत सहजपणे भ्रमंती करता येईल अशा ‘स्मार्ट व्हील चेअर’ निर्मितीद्वारे उचलले.
विविध महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी पवन ऊर्जेवर आधारित अनोखा प्रकल्प तयार केला. रेल्वे ज्या वेळी धावते, त्या वेळी त्या विरुद्ध जो हवेचा झोत निर्माण होतो, त्याचा वापर करत पवन ऊर्जेच्या साहाय्याने रेल्वेतील पंखे, दिवे चालविणे आणि अतिरिक्त ऊर्जा साठवून ठेवणे या माध्यमातून शक्य आहे. औद्योगिक कारखान्यात कामगारांची सुरक्षितता, वेळेचा व पैशाचा अपव्यय टाळावा यासाठी गोखले एज्युकेशनच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी यंत्र तयार केले आहे. ज्याचा प्रत्यक्ष वापर मुंगे इंडस्ट्रीत होत आहे.
आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘टेराबॉट’ उपकरण तयार केले आहे. ज्या माध्यमातून डोंगर चढाई, दुर्गम परिसरात रोबोटच्या साहाय्याने मदत पोहोचवता येईल. तळ्यातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी जलवाहिनींचा वापर यावर माहिती देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनांचे भित्तिचित्र प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे.