येथील ई अॅण्ड जी इनोव्हेटिव्ह एज्युकेशन संस्थेच्या वतीने नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी ‘ई-संवाद’ या उद्योजकांना मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे.
हॉटेल ताज या ठिकाणी हा कार्यक्रम होईल. उद्योजक आणि उद्योजकांसाठी क्रांती घडविणारा, त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा ई संवाद कार्यक्रम उद्योग जगतात आजवर महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आला आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रांतील उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र येत आपले विचार, कल्पना, आपल्याकडील संकल्पनांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात.
यंदा या महोत्सवात क्वॉन्ट मलिपचे महाव्यवस्थापक राजीव तलेरजा मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अंध उद्योजक भावेश भाटिया आपल्या कामाबद्दल माहिती देणार आहेत. हातगाडी चालवून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या या व्यक्तीची आजची उलाढाल २५ कोटी रुपयांची आहे. ब्राझील २०१६ मध्ये होणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी असलेल्या ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली आहे. नॅचरल सलून व स्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. कुमारवेल, इंडेल्स अॅडव्हायझरीचे सहसंचालक सुशील मुणगेकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.