उद्योगांसाठी राज्यात विजेचे सर्वाधिक दर आहेत. उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या दरात कपात करण्याविषयी गांभीर्याने विचार करावा, सिन्नर औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा यासह अनेक प्रश्नांवर स्थानिक उद्योजक संघटनांनी शुक्रवारी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले.
सिन्नर येथे आदर्श इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या कै. वसंतराव देशपांडे सभागृहाचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. या दौऱ्यात निमा, आयमा व सिन्नरच्या उद्योजक संघटनांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांसह प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत चर्चा केली. उपरोक्त सोहळ्यास सिन्नरचे आ. राजाभाऊ वाजे, नगराध्यक्षा अश्विनी देशमुख, मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.
पूर्वी केवळ मोठय़ा गावात वा शहरापर्यंत मर्यादित असणारे शिक्षण आता ग्रामीण भागात समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंत विस्तारल्याचे देसाई यांनी नमूद केले.

राज्यात शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करण्यासाठी लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तींची महत्त्वपूर्ण काम केले. आर्थिक उन्नतीपेक्षा ज्ञानसाधनेला अधिक महत्त्व आहे. राज्यात शिक्षणाची क्रांती होण्यात अनेक विभूतींनी आपले जीवन वाहून घेतले. ज्ञानाचा प्रकाश गावोगावी पोहोचविणाऱ्या दीपस्तंभामुळे अनेकांचे जीवन समृद्ध झाले. कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन अशा कार्यातून आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. वाचनालय सभागृहाच्या उद्घाटनात देसाई यांनी नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यात वाचनालयांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले. वाचनाची आवड व विषय काळानुरूप बदलले आहेत. ज्या गावात चांगले वाचनालय आहे, अशी गावे सुसंस्कारित झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.