छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्यायदिन म्हणून नाशिक आणि धुळे येथे रविवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. धुळे येथे जिल्हा प्रशासन, तर नाशिक येथे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त यांच्या वतीने यानिमित्त समता दिंडी काढण्यात आली.

नाशिक येथे गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सामाजिक न्यायदिन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेंद्र कलाल हे होते.

या वेळी प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे, सहायक आयुक्त के. जी. बागूल, शाहू विचारांचे अभ्यासक प्रा. अशोक सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, अनिता राठोड आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून ध्येयाप्रती नेहमी जागृत राहिले पाहिजे. युवकांनी सैराटपण सोडून महापुरुषांच्या विचार व आचारांची कास धरली पाहिजे, असे मत कलाल यांनी व्यक्त केले. काशिनाथ गवळे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार मूल्यांवर आजच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल सुरू असल्याचे नमूद केले. प्रा. अशोक सोनवणे यांनी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य’ या विषयावरील व्याख्यानात अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, सामाजिक दुजाभाव, दारिद्रय़ यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी अविरत मेहनत घेतल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा शुक्ल यांनी केले. आभार सी. एम. त्रिभुवन यांनी मानले. कार्यक्रमापूर्वी हुतात्मा स्मारक येथून समता दिंडी काढण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते दिंडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक समतेवर आधारित पथनाटय सादर केले. केटीएचएम महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर जिवंत देखावा सादर केला. धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयापासून समता दिंडी व व्यसनमुक्ती संदेशयात्रा काढण्यात आली.

या दिंडीत शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभारी जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते. त्यांनी समता दिंडीला हिरवा झेंडा दाखविला. या वेळी देशमुख यांनी शाहू महाराजांनी शाळा, वसतिगृह, शिष्यवृत्ती सुरू करीत बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचे सांगितले.