अनिकेत साठे

भूगर्भातील हालचालींचा वेध घेण्यासाठी राज्यात उभारलेल्या ३५ पैकी जवळपास २३ भूकंपमापन वेधशाळेतील उपकरणे बंद पडली आहेत. भूकंपाचा धक्का जाणवला तर केंद्रबिंदू शोधण्यासाठी किमान तीन वेधशाळांतील नोंदींची गरज असते. अनेक वेधशाळांतील उपकरणे बंद असल्याने त्या नोंदीच मिळत नाहीत. परिणामी, राज्यात कुठेही धक्के बसले तरी त्याचा केंद्रबिंदू निश्चित करण्यास येथील भूकंप आघात सामग्री आणि पृथक्करण कक्ष असमर्थ ठरत आहे. भूगर्भातील हालचालींचे मापन, अभ्यास करणारी राज्य शासनाची ही समन्वय संस्था आहे. भूकंपमापन उपकरणांचे अद्ययावतीकरण रखडल्याने ही संस्था अंधारात चाचपडत आहे.

काही दिवसांत पालघर भागात भूकंपाचे सातत्याने धक्के बसले. त्यांची नोंद महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्थेच्या प्रांगणातील या कक्षाच्या भूकंपमापन वेधशाळेत झाली; पण त्याचा केंद्रबिंदू शोधता आला नाही. या केंद्रापासून किती अंतरावर धक्के बसले इतकीच माहिती समजली.

पालघर परिसरात हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था (एनजीआरआय) संस्थेची भूकंपमापन केंद्रे आहेत. या समांतर व्यवस्थेमुळे तेथील भूकंपाचा केंद्रबिंदू निश्चित झाला असला तरी राज्याची मुख्य संस्था तो काढू शकली नाही, कारण या समन्वय संस्थेची राज्यात सध्या जेमतेम १२ वेधशाळांतील उपकरणे सुरू आहेत. मुख्यालयातील मापन करणारी दोनपैकी एक यंत्रणा बंद आहे. नाशिकच्या केंद्रापासून ९७ ते ९८ किलोमीटर अंतरावर हे धक्के बसले इतकीच या कक्षाकडील माहिती आहे. धरण सुरक्षितता संघटनेच्या अंतर्गत भूकंप आघात सामग्री आणि पृथक्करण कक्ष कार्यरत आहे. धरणांच्या सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व खोऱ्यांत ३५ भूकंपमापन वेधशाळा स्थापन केल्या होत्या.

जुन्या पद्धतीच्या ‘अ‍ॅनालॉग’ यंत्रणेवर त्यांचे काम चालते. या वेधशाळांमार्फत प्राप्त होणाऱ्या नोंदीद्वारे आघात सामग्री कक्ष अभ्यास करतो; तथापि वेधशाळांमधील जुनाट यंत्रणा बंद पडत चालल्याने भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करणेही अवघड झाले आहे.

बंद उपकरणांच्या जागी डिजिटल पद्धतीची नवी यंत्रणा बसविल्यास भूगर्भातील अतिसूक्ष्म हालचालींची माहिती तत्काळ मिळू शकते. त्या अनुषंगाने ३५ भूकंपमापन वेधशाळांत डिजिटल यंत्रणा बसवून कक्षाच्या मुख्यालयात माहिती संकलनासाठी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागास दिला गेला होता. ११ वर्षे उलटूनही तो मार्गी लागलेला नाही. शासनाने समिती स्थापन करून प्रस्तावाचा अभ्यास केला. समितीने मापन केंद्रांची संख्या कमी असेल तरी चालेल, असा अभिप्राय दिल्याने तो विषय रखडलेला आहे. १० ते १२ वेधशाळा वगळता उर्वरित केंद्रांचे काम बंद पडले. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर त्याचा केंद्रबिंदू समजणे महत्त्वाचे असते. त्याकरिता किमान तीन वेधशाळांच्या नोंदींची गरज भासते. या आधारे केंद्रबिंदू शोधण्याची प्रक्रिया पार पडते, असे या कक्षाच्या वैज्ञानिक अधिकारी चारुलता चौधरी यांनी सांगितले. भूकंपाच्या नोंदी घेणारी बहुतांश उपकरणे बंद असल्याने केंद्रबिंदू शोधणे जिकिरीचे झाले आहे.

राज्यात कोयना, वारणा खोरे भूकंपप्रवण क्षेत्र मानले जाते. या खोऱ्यांत १२ भूकंपमापन वेधशाळा आहेत; पण आता त्यातील दोन वेधशाळांकडून नोंदी प्राप्त होतात. कोयना परिसरात काही ठिकाणी डिजिटल यंत्रणाही बसविली गेली; परंतु ती व्यवस्थित काम करत नसल्याचे कारण स्थानिक अधिकारी देतात. नोंदी मिळत नसल्याने भूकंपाचा केंद्रबिंदू शोधण्यास अडचणी येतात. राज्यातील सर्वच्या सर्व ३५ वेधशाळांत डिजिटल भूकंपमापन यंत्रणा, उपकरणे बसवून ती अद्ययावत करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच शासनास सादर करण्यात आला आहे. तो मान्य झाल्यास भूकंपमापन, केंद्रबिंदू शोधण्याची प्रक्रिया जलदपणे होईल. शिवाय क्षेत्रनिहाय सखोलपणे अभ्यासही करता येईल.

– चारुलता चौधरी, संशोधन अधिकारी, भूकंप आघात सामग्री आणि पृथक्करण कक्ष, नाशिक