गर्भपात प्रकरणाची चौकशी करणार

डॉ. वर्षां लहाडे प्रकरण जिल्हा रुग्णालयातील  अवैध जिल्हा शासकीय रुग्णालयातील तत्कालीन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षां लहाडे यांनी रुग्णालयाचा प्रसूती कक्ष आणि अन्य माध्यमांचा वापर करत अवैधरीत्या गर्भपात केल्याचा प्रकार एप्रिल २०१७ मध्ये उघड झाला होता. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात डॉ. वर्षां लहाडे यांचा सहकाऱ्यांसह अवैध गर्भपात प्रकरणात हात असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने केलेल्या तक्रारीनंतर उघड झाले. रुग्णालयातील त्रुटी तसेच ढिसाळ कामकाजावर चौफेर टीका होत असताना हा विषय विधान परिषदेतही गाजला. शासकीय  रुग्णालयात घडणाऱ्या बेकायदेशीर गर्भपाताच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय गर्भपात कायदा (एमटीपी अ‍ॅक्ट)ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आणि सेवानिवृत्त आरोग्य संचालक यांच्यामार्फत चौकशी व्हावी, अशी सूचनाही करण्यात आली होती.

त्यानुसार चौकशीकरिता सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रकाश डोके, अनुदानित शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ, साहाय्यक संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती चौकशीनंतर महिनाभरात  अहवाल सादर करणार आहे.

डॉ. वर्षां लहाडे यांची याआधीही चौकशी

माजी सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेली समिती डॉ. वर्षां लहाडे प्रकरणाचा अभ्यास करणार आहे. वास्तविक हा प्रकार उघडकीस आल्यावर डॉ. लहाडे आणि त्यांच्या सहकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्यात आले होते. तसेच त्यांची जिल्हा रुग्णालय, उपसंचालक तसेच राज्यस्तरावर चौकशी करण्यात आली. या तिन्ही चौकशींचे अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आले. डॉ. लहाडे प्रकरण गर्भपात कायद्याशी संबंधित आहे. – डॉ. सुरेश जगदाळे(जिल्हा शल्य चिकित्सक)