कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीत अल्पशा कपातीतून विरोधकांना शांत करण्याची प्रशासनाची चलाखी

शहरातील कला आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत प्रदीर्घ काळापासून महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महाकवी कालिदास कला मंदिराच्या भाडेवाढीवर नूतनीकरणानंतर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. भरमसाट भाडेवाढीला नाटय़ कलाकारांसह नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविल्याने त्यांचा राग शांत करण्यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या भाडेवाढीत अल्पशा कपात करण्याची चलाखी प्रशासनाने दाखविली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दर तीन वर्षांनी भाडय़ात पाच टक्के वाढ करण्याचे अधिकार आयुक्तांना बहाल करण्यात आले आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत नूतनीकरण झालेले कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायीसमोर ठेवला होता. प्रस्तावित भाडेवाढीबद्दल महिनाभरापासून कलावंत वर्तुळातून नाराजीचे सूर उमटत होते. स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेसच्या सदस्यांनी भाडेवाढीला विरोध केला होता. भाजपच्या नऊ सदस्यांनी लेखी पत्र देऊन सर्वाना परवडणारी भाडेवाढ करावी, असे सूचित केले होते.

संगीता जाधव यांनी कलामंदिर हे नाशिकचे वैभव असून ते पैसे कमविण्याचे साधन नसल्याचे सुनावले. प्रवीण तिदमे, समीर कांबळे आदींनी तो मुद्दा अधोरेखित करत भाडेवाढीला विरोध केला. जुनेच दर कायम ठेवण्याची मागणी केली. साहित्य, कला जोपासण्यासाठी पालिकेला काही तोटा सहन करावा लागला तरी हरकत नाही. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणारे हे व्यासपीठ आहे. भाडेवाढीमुळे कलावंत त्यापासून दूर जातील, असा इशारा सदस्यांनी दिला. सदस्यांच्या आक्षेपावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, कलामंदिराचे अंतर्बाह्य़ रंगरूप पालटले आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती, व्यवस्थापन खर्चीक आहे.

नव्याने निर्माण झालेल्या सुविधा पुढील १० ते १५ वर्षे टिकवायच्या असतील तर त्यासाठी योग्य व्यवस्थापन, देखभाल होणे आवश्यक आहे. भाडेवाढीतून नूतनीकरणावरील खर्च वसूल करण्याचा हेतू नाही. मागील पाच वर्षांतील अभ्यास करून हे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. भाडेवाढीचा बोजा कलाकार, नागरिकांवर नव्हे, तर नोंदणी करणाऱ्या नाटय़ व्यावसायिकांवर पडणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. सर्वाचे म्हणणे जाणून घेत स्थायी सभापती हिमगौरी आडके यांनी भाडेवाढीचा निर्णय जाहीर केला. निश्चित झालेल्या या दरात दर तीन वर्षांनी आयुक्त पाच टक्के वाढ करू शकतील, असेही मान्य करण्यात आले. महात्मा फुले कला दालनाचे वाढलेले दर कायम राहणार आहेत.

कलामंदिराचे भाडे (प्रशासनाने सुचविलेले दर)

रंगीत तालीम, बालनाटय़, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे प्रयोग, हौशी नाटक, व्याख्यान, शासकीय कार्यशाळा या गटात पहिल्या सत्रात साडेचार हजार (प्रशासनाने सुचविलेला दर सहा हजार), दुसरे सत्र ६००० (आठ हजार) आणि तिसऱ्या सत्रात आठ हजार रुपये (११०००) असे राहतील.

तिकीटदरावर भाडे आकारणी

व्यावसायिक नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य या गटात पहिल्या सत्रासाठी ५०० रुपयांच्या आत तिकीट दर असल्यास १० हजार, दुसऱ्या सत्रात १२ हजार आणि तिसऱ्या सत्रात १४ हजार रुपये भाडे द्यावे लागेल. ज्या कार्यक्रमाचे तिकीट दर ५०० रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना पहिल्या सत्रात १५ हजार, द्वितीय सत्रात १७ हजार, तर तिसऱ्या सत्रासाठी २० हजार रुपये भाडे द्यावे लागणार आहे. प्रशासनाने या गटासाठी अनुक्रमे १५ हजार, १८ हजार आणि २१ हजार भाडे सुचविले होते. पूर्वीच्या भाडय़ाच्या तुलनेत हे भाडे पाचपट होते. त्यात कपात करून ते तिप्पट, चौपट करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

वाद्यवृंद, कार्यशाळेसाठी अधिक भाडे

वाद्यवृंद, कार्यशाळा, अन्य कार्यक्रमासाठी ५०० रुपयांहून अधिक तिकीट असणाऱ्या तसेच त्यापेक्षा कमी तिकीट असणाऱ्या कार्यक्रमांसाठी भाडेवाढ निश्चित करण्यात आली. त्यानुसार ५०० रुपयांच्या खाली तिकीट असणाऱ्या कार्यक्रमास पहिल्या सत्रात २० हजार, द्वितीय सत्रात २३ हजार, तर तृतीय सत्रात २५ हजार इतके भाडे द्यावे लागणार आहे. ५०० रुपयांहून अधिक तिकीट असणाऱ्या कार्यक्रमात पहिल्या सत्रात २५ हजार, दुसऱ्या सत्रात २७ हजार, तर तिसऱ्या सत्रात २९ हजार भाडे आकारले जाईल. प्रशासनाने हे दर अनुक्रमे २५ हजार, २८ हजार आणि ३१ हजार रुपये सुचविले होते.

महात्मा फुले कला दालन

कला प्रदर्शनासाठी २० हजार रुपये, चर्चासत्र, व्याख्यानमाला यासाठी १० हजार रुपये, तयारीसाठी सकाळी सहा ते सकाळी नऊ या कालावधीसाठी दोन हजार रुपये, तयारी साहित्य ठेवण्यासाठी रात्री नऊ ते सकाळी नऊ यासाठी पाच हजार रुपये. चित्रशिल्प, कला प्रदर्शनासाठी वरचा मजला सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीसाठी २० हजार रुपये भाडे आकारले जाईल.