21 February 2020

News Flash

सभास्थानी ‘इव्हीएम’ विषयी जनप्रबोधन

पंतप्रधानांची सभा राजकीय असली तरी सभेनिमित्त लोक मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी जमल्याने आम्ही येथे आलो आहोत.

इलेक्टॉनिक मतदान यंत्र ‘इव्हीएम’ विषयी राजकीय पक्षांमध्ये असलेल्या मतभिन्नतेच्या पाश्र्वभूमिवर मतदारांमध्ये या यंत्राविषयी असलेल्या शंका दूर व्हाव्यात, त्यांचे समाधान व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने इव्हीएमविषयी जनप्रबोधन करण्याची संधी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनिमित्त साधण्यात आली. मतदारांच्या वेगवेगळ्या शंकांचे समाधान करतांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले.

मुंबईतील बैठकीनंतर बुधवारी निवडणूक आयोगाने मतपत्रिका या कालबाह्य़ झाल्या असून आगामी सर्व निवडणुका इव्हीएमव्दारेच होणार असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही  इव्हीएम वापराविषयी मतदारांमध्ये संभ्रम आहे. इव्हीएमवरील बटण दाबले की मत दुसऱ्याच पडते..व्ही पॅट वर क्रमांक दुसराच दिसतो..आवाज लवकर येत नाही, अशा अनेक शंका उपस्थित होत असतात. या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचा लाभ उठविण्याचे ठरविले. सभेसाठी झालेल्या गर्दीत सहभागी होत मतदारांचे समाधान केले. त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे दोन रथ या ठिकाणी आणण्यात आले होते. रथावर इव्हीएम, व्हीपॅट ठेवण्यात आले होते.  प्रत्यक्ष मतदान कसे होते, यंत्रातून मतपत्रिका कशी बाहेर पडते, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. काहींनी स्वत मतदान करून पाहिले. इव्हीएम यंत्रावरील चिन्ह आणि प्रत्यक्ष राजकीय चिन्ह वेगळे कसे, मताची नोंद झाली का, आवाज का येतो, अशा वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या गेल्या.

रथावरील कर्मचारी सच्चिदानंद मोरे यांनी आपले म्हणणे मांडले. इव्हीएमविषयी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी लोकांमध्ये जाणे गरजेचे आहे. पंतप्रधानांची सभा राजकीय असली तरी सभेनिमित्त लोक मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी जमल्याने आम्ही येथे आलो आहोत. लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी राजकीय विरोध असल्याने कॉलनी, वस्ती परिसरात जाता येत नाही. आम्ही सरकारी कर्मचारी आहोत हे त्यांना पटवून द्यावे लागते. त्यामुळेच या गर्दीत थेट मिसळत प्रबोधनासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मोरे यांनी सांगितले.

रथ सभास्थळापासून हाकेच्या अंतरावर होता. रथावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र होते. सभास्थळी येणाऱ्या लोकांचा हा रथ राजकीय पक्षाचा असल्याचा समज होऊन सभा कधी सुरू होणार, मोदी कधी येणार, सभास्थळी जायचं कसे, अतीमहत्वाचा पास कुठे मिळणार, सभेत बसायला जागा नाही का, असे प्रश्नही विचारण्यात येत होते.

First Published on September 20, 2019 1:55 am

Web Title: evm political party akp 94
Next Stories
1 सोनसाखळी चोरीचे प्रकार सुरुच
2 बंदोबस्त, उत्साह आणि घोषणाबाजी..
3 ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ निवड समिती स्थापन
X