‘उत्तम प्रकारच्या वास्तूची निर्मिती करणे गरजेचे’

देशाची आणि संस्कृतीची ओळख तेथील वास्तुरूपाने होत असते. त्यामुळे उत्तम प्रकारच्या वास्तूची निर्मिती करणे ही गरज आहे. देशामध्ये याआधीही अनेक नामवंत वास्तुविशारदांनी आपल्या कार्यशैलीचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत लोकोपयोगी वास्तु निर्माण केल्या पाहिजेत, असे मत वास्तुविशारद धनंजय शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील आयडिया महाविद्यालयाच्या वास्तुविशारदांच्या प्रकल्पांवर आधारित ‘एक्सक्लेम २०१८’ या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी कुसुमाग्रज स्मारकात शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यावर्धन ट्रस्ट संचालित इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन एन्व्हायर्न्मेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर (आयडिया) महाविद्यालयाच्या वतीने आधुनिक भारतीय आर्किटेक्चरची पायाभरणी या विषयावर आयोजित या वास्तुप्रदर्शनाला उत्साहात सुरुवात झाली. या प्रदर्शनात देशातील प्रसिद्ध वास्तूंची प्रतिकृती मांडण्यात आली आहे. यामध्ये बी. व्ही. दोशी यांनी तयार केलेले अरण्या हौसिंग (निर्माण १९८९) गृह प्रकल्पाच्या प्रतिकृतीचा समावेश आहे. गरिबांना परवडतील अशा घरांची निर्मिती, कमीत कमी जागेचा योग्य वापर हे त्या वास्तूंचे वैशिष्टय़ आहे.

अहमदाबाद येथील प्रेमाभाई हॉल, कानपूर येथील आय. आय. टी.ची पी. के. केळकर लायब्ररी, सिंगापूर येथील स्काय हॅबिटाट-मोशे सफादी ही २८ मजली इमारत, डब्लू ५७-मॅनहटन न्यूयॉर्क ही ३२ मजली इमारत, टोकियो येथील कॅप्सूल टॉवर, सिंगापूर येथील द इंटरलास ३१ मजली इमारत, मुंबई येथील कांचनजंगा, बंगळूरु येथील कोरामंगल अशा वास्तुक्षेत्रातील उल्लेखनीय इमारतींच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत.

या प्रदर्शनाविषयी महाविद्यालयाचे संचालक विजय सोहोनी यांनी माहिती दिली. प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना नवीन कल्पनेवर काम करता येते. या क्षेत्रात ज्यांनी उत्तम काम केले त्यांच्या कामातून प्रेरणा घेत प्रत्यक्ष त्या संकल्पनेवर प्रदर्शनात मुले काम करतात.

यामध्ये त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळतो. त्यातून नवीन संकल्पना समोर येतात. त्या प्रत्यक्षात येण्यासाठी मुले सक्रिय होत असल्याचे सोहोनी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचे हे प्रदर्शन १५ एप्रिलपर्यंत नाशिककरांसाठी खुले राहणार आहे. जास्तीजास्त नाशिककरांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन सोहोनी यांनी केले आहे

सर्व शैलींचा एकत्रित संगम

प्रदर्शनात जगभरातील काही प्रसिद्ध वास्तूच्या प्रतिकृती आहेत. त्या वास्तूंचे रचनाकार असलेले वास्तुविशारद अच्युत कानविंदे, बी. व्ही. दोशी आणि चार्ल्स कोरिया यांच्या कार्यशैलीचे एकत्रीकरण करत एक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी एकत्र येत इमारतीचा विषय घेत त्यावर काम केले आहे. यामध्ये महापालिकेसाठी बाजार, विज्ञान केंद्र, व्यापारी संकुल आणि गरीब लोकांना परवडतील अशी कमी खर्चातील घरे याबाबत आराखडे तयार केले आहेत.