सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा, जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला असला तरी अद्याप लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका कुटुंबावर भूतबाधा करीत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी हल्ला करण्याचा आणि बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोलीजवळील बोंबीलटेक येथे देवराम शिद पत्नीसोबत राहतात. या भागातील काही ग्रामस्थ वारंवार आजारी पडत असल्याने वैद्यकीय उपचार करण्यापेक्षा ग्रामस्थांनी पेठ तालुक्यातील लिंगवणा येथील सीताबाई भोये या भगतास आणले. भगताने गावात येऊन काही अघोरी प्रयोग केले. त्यानंतर गावातीलच सीताबाई पारधी आणि थबीबाई पारधी या अंगात कालिका देवी आल्याचे सांगत घुमू लागल्या. त्या महिलांनी देवराम शिद हे चेटूक असून त्यांच्यामुळे गावातील नागरिकांना धोका असल्याचा आरोप केला. त्यानंतर ग्रामस्थांनी शिद यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. गावात राहू नको, असे सुनावत कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी तक्रार शिद यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात केली.

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. आहेर यांनी ग्रामस्थ तसेच शिद यांच्याशी चर्चा करत दोघांनाही समज दिली. हा कोणत्याही अंधश्रद्धा अथवा जादूटोण्याचा प्रकार नाही. जागावादातून हे प्रकरण उद्भवल्याचे त्यांनी सांगितले.