01 December 2020

News Flash

देशी कांदाच सरस

दरात हजार रुपयांनी वाढ; परदेशी कांद्याची विक्री करताना व्यापाऱ्यांची दमछाक

पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांच्या खळ्यात दाखल झालेला परदेशी कांदा. (छाया - हेमंत थेटे)

अनिकेत साठे

जिल्ह्य़ात परदेशी कांदा दाखल होऊनही सोमवारी स्थानिक कांद्यानेच भाव खाल्ल्याचे पाहायला मिळाले. परदेशी कांद्याला चव नाही. आकारातही फरक आहे. त्यास मागणी नसल्याने विक्री करताना दमछाक आणि नुकसान होण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत. परदेशी कांदा येऊनही जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये स्थानिक कांद्याच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली. दिवाळीत बाजार समित्या काही दिवस बंद राहतील. दरवाढीचे तेदेखील एक कारण आहे.

लासलगावसह बहुतांश बाजार समितीत उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात ८०० ते एक हजार रुपयांनी वाढ झाली. महत्त्वाची बाब म्हणजे तुर्कस्तान, इजिप्तहून आयात केलेला कांदा महानगरांसह देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक कांद्याचा भावाचा आलेख चढता राहिला. पिंपळगाव, लासलगावच्या व्यापाऱ्यांनी सुमारे २५ कंटेनर परदेशी कांदा मागविला; परंतु त्यांचे हात पोळले गेले. याचे कारण त्या कांद्याला चव नसण्यात असल्याचे पिंपळगाव बसवंतचे व्यापारी अतुल शहा यांनी सांगितले. परदेशी कांदा दिसायला चांगला असला तरी त्याला चव नाही. दैनंदिन भाजीसाठी तो वापरता येत नाही. त्यामुळे त्यास उठाव नसून तो पडून असल्याचे व्यापारी सांगतात. स्थानिक नव्या कांद्याची आवक वाढण्यास महिनाभराचा कालावधी आहे. तोपर्यंत चाळीत साठविलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याचे भावदेखील चढेच राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोमवारी लासलगाव बाजार समितीत देशी उन्हाळ कांद्याचे भाव हजार रुपयांनी वधारले. सकाळच्या सत्रात २७०० क्विंटलची आवक झाली. त्यास क्विंटलला सरासरी ४६५१ रुपये दर मिळाले. दोन दिवसांपूर्वी हे दर ३४०१ रुपये होते. पिंपळगाव बसवंत बाजारासह अन्य बाजार समित्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात भाव असेच राहिले. दिवाळीतील सुट्टीमुळे बाजार समित्यांचे कामकाज चार ते पाच दिवस बंद राहणार आहे. या काळातील गरज लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी खरेदीचे नियोजन केल्याने भाव वाढल्याचा अंदाज आहे.

नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी व्यापारी अल्प किमतीत खरेदी केलेला परदेशी कांदा स्थानिक कांद्यास मिसळून विक्री करत असल्याची साशंकता व्यक्त केली. शेतकऱ्यांनी भाव गेल्या वर्षीप्रमाणे १० ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील याची प्रतीक्षा न करता योग्य वेळी माल बाजारात नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशी कांदा स्थानिक कांद्यात मिसळून विक्री केला जात असल्याची बाब नाशिक जिल्हा व्यापारी संघटनेने नाकारली. काही व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान, इजिप्तमधून कांदा आयात केला. तुर्कस्तानहून अधिक प्रमाणात माल आला. स्थानिक कांदा आणि परदेशी कांद्याचा दर्जा वेगवेगळा आहे. तो एकत्र (भेसळ) करण्यासारखा पदार्थ नाही. मुंबई, पुण्याच्या निर्यातदारांकडून महानगरांमध्ये तो वितरित होत असल्याचे व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार डागा यांनी सांगितले.

बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालाच्या लिलावासाठी आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या कांद्याच्या लिलावास आम्ही प्रतिबंध केला. केंद्र सरकारने स्थानिक कांद्यावर निर्यातबंदी लादली. दुसरीकडे परदेशातून कांदा आयात करून स्थानिक कांद्याचे भाव पाडले. या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांद्याला अत्यावश्यक सेवेतून वगळल्यानंतर पुन्हा निर्बंध लादणे योग्य नव्हते. दिवाळीत बाजार काही दिवस बंद राहतील. याचा प्रभाव सध्या कांदा भावावर पडला आहे.

– आ. दिलीप बनकर (सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:16 am

Web Title: exhaustion of traders while selling foreign onions abn 97
Next Stories
1 १४ हजारांहून अधिक इमारती, घरे प्रतिबंधमुक्त
2 आंदोलनाद्वारे समितीची ‘अंजनेरी वाचवा’ची हाक
3 मालेगाव पश्चिम क्षेत्र औद्योगिक वसाहतीचे स्वप्न पूर्णत्वाकडे
Just Now!
X