नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचा शतक महोत्सव

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त संस्थेतील इयत्ता आठवी ते 12 वीच्या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या विविध उपकरणांचा आविष्कार येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात आयोजित ‘आय.ओ.टी. इंटरनेट ऑफ थिंग्स’ प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात 5क् पेक्षा अधिक प्रकल्प मांडण्यात आले आहेत.

या आगळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाचे म्हणजेच ‘आय.ओ.टी. इंटरनेट ऑफ थिंग्स’ प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी टीडीके इंडिया प्रा. लिमिटेडचे महाव्यवस्थापक अभिजित आमडेकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्याोजक हृषीकेश वाकडकर उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, संगणक विभागप्रमुख दिवाकर यावलकर, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी होते. या वेळी आमडेकर यांनी हे भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान प्रदर्शन असून याकडे गंमत जंमत म्हणून न बघता या तंत्रज्ञानाचा उपयोग समाज उपयोगासाठी केला पाहिजे, असा सल्ला दिला. जिल्ह्य़ात आणि कदाचित महाराष्ट्रातही पहिल्यांदाच अशा प्रकारचे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुरुवारीही प्रदर्शन खुले असून प्रदर्शनात शहर आणि जिल्ह्य़ातील  65 शाळांनी सहभाग नोंदविला आहे. या प्रदर्शनास विद्यार्थ्यासह सर्वानी भेट द्यावी, असे आवाहन दाबक यांनी केले आहे. प्रदर्शनात प्रश्न मंजूषेसाठी बजर, स्वयंचलित रेल्वे फाटक, रेल्वे दुर्घटना ओळख प्रणाली, स्मार्ट उपस्थिती प्रणाली अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी प्रदर्शन मुंबईत नेण्याची तयारी

संस्थेच्या शतक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी शतक महोत्सवी उपक्रमात आयओटी प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आल्यावर प्रदर्शन पाहण्यास येण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

याची आठवण त्यांना करून देण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता संस्थेच्या वतीने मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांना सदर प्रदर्शन दाखविण्याचे नियोजन संस्था करीत असल्याचे दाबक यांनी सांगितले.