31 May 2020

News Flash

राजकीय पर्यटनापेक्षा नुकसानग्रस्तांना प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा

लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांशी बोलत सडलेले पीक हातात घेत, चिखल तुडवत कुठे शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवत ‘फोटोसेशन’ करण्यात मग्न असतो.

|| चारुशीला कुलकर्णी

पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे पिकांचे नुकसान, शेतकरी सरकारी मदतीच्या आशेवर  : – राज्यात सर्वत्र ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना राजकीय मंडळी थेट बांधावर जावून शेतकऱ्यांच्या अडी अडचणी समजून घेत आहेत. शेतकऱ्यांना पडलेला कर्जाचा फेरा, विस्कटलेली शेतीची घडी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु, आस्मानी संकटाने हादरलेला शेतकरी या राजकीय पर्यटनाला कंटाळला असून प्रत्यक्ष कृती करण्याची मागणी करत आहे.

जिल्ह्य़ात परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यानंतर बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, द्राक्षे, टोमॅटो, भाजीपाला यासह अन्य पिकांचे  नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी अधिकारी, पीक विमा कंपन्यांकडून होत आहेत. नुकसानभरपाईविषयी निश्चिती नसली तरी हवालदिल झालेला शेतकरी सरकारी मदत आज ना उद्या मिळेल या आशेवर असतांना हाताशी असलेले पीक कसे वाचवता येईल, या विवंचनेत आहे. दुसरीकडे, लोकप्रतिनिधी, मंत्री नुकसान झालेल्या परिसरास भेट देत आहेत. राजकीय मंडळींचा ताफा हा अचानक कुठल्याही शेतात, बांधावर जाऊन धडकतो. त्यासोबत काही सरकारी अधिकारी असतात. सरकारी मदत आपल्याला लगेच मिळणार, या आशेने भांबावलेले शेतकरी आपली ढिगभर गाऱ्हाणी लोकप्रतिनिधींसमोर मांडतात.

लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांशी बोलत सडलेले पीक हातात घेत, चिखल तुडवत कुठे शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवत ‘फोटोसेशन’ करण्यात मग्न असतो. पाऊस थांबल्यानंतर राजकीय पर्यटन मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आदित्य ठाकरे, खा. हेमंत गोडसे यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांनी जिल्ह्य़ाचा धावता दौरा पूर्ण केला. कोणी शेतकऱ्यांना भेटले, कोणी काही शेतकऱ्यांशी चर्चा करत चिखलात फसलेला पाय काढत दौरा आटोपला. शेतकऱ्यांची झोळी मात्र रिकामी राहिली.

आमचं संपूर्ण कुटुंब शेतावर आहे. १२ एकर मध्ये केवळ भात होतो. पावसामुळे भाताचे पीक हातचे गेले. वैरणही पावसामुळे खराब झाली. यामुळे पुढच्या काही महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचे काय, हा प्रश्न गंभीर होईल. दुसरीकडे, राजकीय मंडळी-लोकप्रतिनिधी येतात आणि फोटो काढून निघून जातात. त्यांना शेतकऱ्यांविषयी काय वाटते, हे लवकरच दिसेल. लोकप्रतिनिधींनी फिरण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी इगतपुरीतील अडवणचे पांडुरंग कोकणे यांनी केली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील संतोष ठोंबरे यांनी सरकार वेगळीच घोषणा करते आणि पंचनामे करणारे अधिकारी वेगळेच सांगतात, असे मांडले. राजकीय मंडळी बांधावर येतात. कुठली तरी पेंडी हातात घेतात. अधिकाऱ्यांसोबत फोटो काढतात आणि निघून जातात. राजकीय पर्यटनापेक्षा आता प्रत्यक्ष मदत हवी. सरकार दरबारी मदत मिळण्यास विलंब होईल, पण त्याची सुरुवात कोठे तरी व्हावी ही अपेक्षा. सर्व घरदार शेतीवर असताना आज पाण्यात असलेले पीक वाचविण्यासाठी पाच वर्षांच्या चिमुकल्यापासून ७० वर्षांपर्यंतची म्हातारी माणसे शेतात राबत आहेत. त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने जाणून घ्या. शेतकऱ्यांवर असलेले कर्ज, खासगी सावकाराचा जाच, आरोग्य असे अनेक विषय आहेत. नुकसानभरपाईच्या पलीकडे विचार करा, याकडे ठोंबरे यांनी लक्ष वेधले.

हैवंही गेलं आणि दैवंही, असे नको व्हावे; कळवण तालुक्यात कांदा पीक पूर्णपणे सडले आहे. शेतकरी कोलमडला असताना अद्याप राजकीय मंडळी फिरकली नाही. कृषी अधिकारी येऊन पंचनामे करून गेले. नुकसान खूप आहे पण मदत कोणाचीही नाही. सरकारी मदत नाही आणि राजकीयही नाही असे नको व्हावे. – धनंजय देवरे (ओतूर, कळवण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:33 am

Web Title: expect direct action victims political tourism akp 94
Next Stories
1 रस्त्यांवर ८६४१ खड्डे ?
2 उदंड झाले पाणी तरीही १६ दिवसांआड नळाद्वारे पुरवठा
3 पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी राजकारण्यांचे दौरे
Just Now!
X