महापालिका शहर बस सेवेचे लोकार्पण

नाशिक : विधानसभेतील रणकंदनानंतर गुरूवारी प्रथमच एकाच व्यासपीठावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मनपाच्या शहर बस सेवेच्या शुभारंभानिमित्त टोलेबाजीचा नवीन डाव रंगला. उभयतांनी झेंडा दाखवून ‘सिटी लिंक’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत महानगर बस सेवेचे लोर्कापण के ले. यावेळी उभय नेत्यांनी विविध मुद्यांवरून परस्परांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

गुरूवारी महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादीचे मंत्री भुजबळ आणि विरोधी पक्षनेते फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित होते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे हे उपस्थित राहू शकले नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे ऑनलाईन उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्यावरून महाविकास आघाडी-भाजपमध्ये  चांगलीच जुंपली आहे. अशावेळी दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येणार असल्याने या सोहळ्याकडे सर्वाचे लक्ष होते. महाविकास आघाडीतर्फे भुजबळ यांनी खिंड लढविली. उभयतांच्या टोलेबाजीने सोहळ्यात वेगळेच रंग भरले गेले.

चांगल्या शहरासाठी चांगल्या सार्वजनिक वाहतुकीची गरज असते. उत्तम सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट महत्वाचे आहे. विविध वैशिष्ठय़े सामावलेली मनपाच्या शहर बस शहरवासीयांना आपलीशी वाटेल, यासाठी आवश्यक ते बदल करण्याची अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. करोना काळात राज्यात अनेक अडचणी होत्या. खरेतर महापालिकेवर प्राथमिक आरोग्य सेवेची जबाबदारी आहे. तरीदेखील पालिकेने अल्पावधीत भव्य रुग्णालय उभारून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तारुढ पक्षाला विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागते, असा चिमटा काढत मदतीसाठी आपण तयार असल्याचे ते म्हणाले.

भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत भाजपला टोले लगावले. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपदी निवड झाली. ही सर्वासाठी आनंदाची बाब आहे. आता रेमडेसिविर, तत्सम औषधे वा प्राणवायू अशा कोणत्याही गोष्टींसाठी भाजपचे पदाधिकारी तसेच आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधता येईल. जगातील कुठलीही परिवहन सेवा फायद्यात नाही. त्यामुळे प्रारंभी तोटय़ातील बस सेवेस आपण प्रतिकूल मत व्यक्त केले होते. तोटा सहन करण्याची क्षमता महापालिकेने प्राप्त करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी पालिके तील सत्ताधारी भाजपच्या नजरेस आणून दिले. शहर सेवेत ५० डिझेल बसचा वापर होणार आहे.

हा धागा पकडून त्यांनी डिझेल इतके  स्वस्त झाले काय, असे उपरोधितपणे नमूद के ले.  खरेतर प्रदूषण वाढविणाऱ्या या बसचा वापर बंद करायला हवा. आज एखादी सेवा वा खर्च न परवडण्यासारखा वाटतो. पण भविष्यात तिचा उपयोग होतो. मनपाने योग्य प्रकारे सेवा न दिल्यास नागरिकांचा विश्वास उडत जाईल. निओ मेट्रो प्रकल्पाचा खर्च मेट्रोपेक्षा कमी आहे. दळणवळणाच्या सुविधा वाढवून शहराचा विकास साधता येईल. विकास कामात आम्ही पक्षीय झेंडे बघत नाही. शहर विकासासाठी सर्व एकत्र काम करतात. निवडणुकीवेळी प्रत्येकाचा झेंडा वेगळा होतो, असेही ते म्हणाले.