जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नाशिक : आदिवासी भागात अंधश्रद्धा फोफावण्यास आणि त्या अधिक बळकट करण्यास अनेक बनावट डॉक्टर, भोंदू वैद्यांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे आदिवासी भागात करोना संकटात बनावट डॉक्टरांची मदत घेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसने के ले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

मुळात आदिवासी भागात आणि इतरत्रही करोनाच्या संभ्रमकाळात लोकांच्या असहायतेचा, अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनेक भोंदू पारंपरिकतेच्या नावाने वेगवेगळे काढे, झाडपाले, मंत्र-तंत्र वगैरेच्या नादी लावून लोकांची लूटमार करीत असल्याचे अनेक माध्यमातून उघड झाले आहे. अशा भोंदूंचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. करोना आपत्ती निवारण विरोधी कायद्यान्वये अशांविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज  असल्याचे अनिसचे म्हणणे आहे.

बनावट डॉक्टरांनी  सातत्याने आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळ करून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यांचे आर्थिक शोषण केलेले आहे.

अंधश्रद्वा पसरविली जात आहे. अशा बनावट डॉक्टरांची मदत घेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसने के ले आहे. निवेदनावर डॉ. ठकसेन गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रा. सुशीलकुमार इंदवे, महेंद्र दातरंगे, नितीन बागूल आदींची स्वाक्षरी आहे.