‘केएफएस मल्टी सोल्युशन्सकडून लाखो रुपयांना गंडा
इतर बँकांपेक्षा अधिक व्याजदर देतो असे आमिष दाखवून येथील केएफएस मल्टी सोल्युशन प्रा. लि. कंपनीने अनेक ग्राहकांची लाखो रुपयांना फसवणूक केली आहे. त्यात ४० लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे सांगितले जात असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आजवर वेगवेगळ्या कंपन्यांच्या भ्रामक योजनांमध्ये फसवणूक होऊनदेखील नागरिक जादा व्याजदर, अन्य सवलतींच्या आमिषांना बळी पडत असल्याचे या घटनेने दाखवून दिले. मार्च २०१४ मध्ये मुंजूकरने केएफएस मल्टी सोल्युशन प्रा.लि. कंपनीचे संभाजी चौक परिसरात आलिशान कार्यालय थाटले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इतर बँकांपेक्षा अधिक व्याजदर तसेच कर्ज व अन्य काही फायदे मिळवून देऊ असे सांगत ग्राहकांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. निफाडसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कंपनीने अनेक भूलथापा दिल्या. वातानुकूलित कार्यालय, कर्मचाऱ्यांवर मेहनत घेत त्याने ग्राहकांवर गारूड पाडत पैसे गुंतवणुकीस भाग पाडले.
हे पैसे शेअर मार्केटमध्ये जात असून व्याजदर अधिक मिळेल असे सांगितले गेले. निफाड येथील शेतकरी गोरखनाथ गुरगुडे यांना सहा महिन्यांसाठी चार लाख ५० हजार रुपयांचे पॅकेज असून यात सहा महिन्यांपासून परतावा मिळण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आले. तसेच १२ महिन्यांनंतर १ लाख ५० हजार, १८ महिन्यांनंतर दीड लाख, २४ महिन्यांनंतर पुन्हा दीड लाख आणि ३० महिन्यांनी पुन्हा साडेचार लाखांची मूळ रक्कम असे एकूण साडेतेरा लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. गुरगुडे यांचे सहकारी शिवाजी शिंदे यांनी तगादा लावल्याने त्यांनी कंपनीतील सोमनाथ नेहे यांच्या सोबत काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करत सहा लाख १५ हजार रुपयांची रक्कम गुंतवली. यानंतर त्यांना ठरावीक कालावधीनंतर वेगवेगळ्या बँकांचे धनादेश दिले गेले. मात्र हे धनादेश वटले नाही आणि हा सर्व प्रकार उघड झाला.
असाच प्रकार अन्य काही ग्राहकांसोबत घडला आहे. राजेश गांधी यांनी १० लाख, हरी थेटे यांनी २ लाख, अमजद सय्यद यांनी एक लाख, समीर सय्यद यांनी ७५०००, दिगंबर राऊत यांनी ६४०००, रावसाहेब शिंदे यांनी तीन लाख ५० हजार, देवीदास मोरे यांनी दोन लाख २५ हजार रक्कम गुंतविली. आतापर्यंत कंपनीने ४० लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.