देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आयोजिलेल्या ‘फॅम टूर’ या अनोख्या उपक्रमांद्वारे राज्याची कला, साहित्य, संस्कृती यासह विविध चालीरितींची ओळख करून देतानाच धरणांचे गाव, कलेचे लेणे आणि खवय्यांची अभिरूची जोपासणारे शहर.. अशी नाशिकची नवीन ओळख या माध्यमातून जागतिक पटलावर नेण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यशस्वी झाला आहे. कुंभमेळा काळात या उपक्रमास पर्यटकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कुंभमेळ्यात परदेशी पर्यटकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन राज्याचे ब्रॅडिंग करण्यासाठी पर्यटन महामंडळाने ‘फॅम टूर’ ही संकल्पना मांडली. त्या उपक्रमात आंतरराष्ट्रीय सहल आयोजित करणारे, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकदार सहभागी झाले. नाशिक विभागाची फॅम टूर नुकतीच पार पडली. यावेळी परदेशी पर्यटकांचे ढोल-ताशाचा गजर, सुगंधी फुलांच्या माळा, कुंकूम तिलक लावून भारतीय पारंपरिक पध्दतीने औंक्षण करून स्वागत करण्यात आले. शिर्डी येथुन सहलीला सुरूवात झाली. साईबाबा समाधीचा दर्शन सोहळा झाल्यावर पर्यटकांना खास महाराष्ट्रीयन पध्दतीचे भोजन देण्यात आले. त्यानंतर भंडारदरा येथील ब्रिटीशकालीन धरण, रंधा फॉल, स्पीलवे गेट आदी दाखविण्यात आले. महामंडळाच्या पर्यटन निवासात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सादर झालेल्या आदिवासी कांबड नृत्याने पर्यटक भारावले. दुसऱ्या दिवसाची सुरूवात नाशिकच्या पांडवलेणी येथे गिर्यारोहणाने झाली. शहराचे विहंगम रुप त्यांनी न्याहाळले. येथील शिल्प व लेणींची माहिती घेत पर्यटकांनी आपल्या शंकाचे समाधान केले. त्यानंतर रामकुंड, कपालेश्वर, काळाराम मंदिरात देव दर्शनाचा सोहळा पार पडला. त्र्यंबककडे प्रस्थान करतांना शहर परिसरातील ‘एज्युकेशन हब’ची झलक त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरली.
डोंगरदऱ्यात विसावलेल्या त्र्यंबकेश्वरचे रुप कॅमेऱ्यात बंदीस्त करण्याचा मोह पर्यटकांना आवरला गेला नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थान व कुशावर्त परिसरात भटकंती केल्यानंतर पर्यटकांना वाईनरीवर नेण्यात आले. मंत्रभूमीची ओळख जपताना शहरात विकसीत झालेले गिर्यारोहण, वाईन, साहसी खेळांची व्यवस्था, धरणे, वारलीसह विविध कलेचा प्रत्यय देणारे शहर अशी ओळख आम्ही मनात घेऊ जात असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली. यावेळी महामंडळाच्यावतीने सर्वाचा निरोप देताना नाशिकची ओळख असलेला कोंडाजी चिवडा आणि महिलांना पैठणीपासून निर्मिलेली पर्स भेट म्हणून देण्यात आली.
‘फॅम टूर’ सुखद अनुभव
भारतातील विशेषत महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांसह येथील कला संस्कृतीचा परिचय व्हावा यासाठी फॅम टूरमध्ये आम्ही सहभागी झालो. चार दिवसांचा कालावधी यासाठी आम्ही निश्चित केला. पण आता महाराष्ट्र पाहण्यासाठी ४ दिवस कमी असल्याचे लक्षात आले. राज्यासह नाशिकवर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. सुखद आठवणी आम्ही सोबत घेऊन जात आहोत.
– टिरा अ‍ॅलीटस
नाशिकचा नवी ओळख करण्याचा प्रयत्न
फॅम टूरच्या माध्यमातून साहसी खेळांची व्यवस्था, नैसर्गिक सौदर्याने नटलेली स्थळे, गिर्यारोहण, वाईन निर्मिती, नदी व धरण काठीवरील ठिकाणे, मंत्रोच्चाराचा सातत्याने जागर पण त्याच वेळी यंत्राचा खडखडाट आणि बदलत्या जीवनशैलीला अंगीकारणारे नाशिक ही ओळख सर्वासमोर आणायची आहे. पर्यटनाचे विविध पर्याय देऊन स्थानिक पातळीवर रोजगारासह विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मंडळाचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यास परदेशी पर्यटकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
– प्रज्ञा बडे-मिसाळ (प्रादेशिक व्यवस्थापक)