News Flash

चलनकल्लोळमुळे शेतमजुरांची उपासमार

वेळेवर औषध फवारणी न झाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जुन्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने आणि त्या बदल्यात नवीन नोटा मिळविण्यात अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याने ग्रामीण भागात शेतमजुरांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. शेतकऱ्यांकडे शेतमजुरांना देण्यासाठी सुटे पैसे नसल्याने कामाअभावी शेतमजुरांची उपासमार होऊ लागली आहे.

नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून जनतेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोसम खोऱ्यासह इतर भागांतील शेतकरी, शेतमजूर या निर्णयामुळे अडचणीत सापडले आहेत. या दिवसांमध्ये डाळिंब आणि द्राक्षबागांमध्ये बदलत्या हवामानाच्या पाश्र्वभूमीवर औषध फवारणी गरजेचे असते. त्यासाठी एक एकर बागेसाठी किमान १० ते १५ शेतमजुरांची आवश्यकता असते. काही श्रीमंत शेतकऱ्यांकडे यापेक्षा अधिक शेतमजुरांची फौज कामाला असते. नोटाबंदीमुळे या सर्वाचीच अडचण झाली आहे.

वेळेवर औषध फवारणी न झाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते नाही. इतर सर्व बँक पतसंस्थामधील सर्व व्यवहार बंद असल्याने जनता हैराण झाली आहे. बँकेत चलन बदलण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला जनता वैतागली आहे. चलन बदलीसाठी संपूर्ण दिवस द्यावा लागत असल्याने मजुरांचे मोठे नुकसान होत आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नाशिक जिल्ह्य़ातील ताहाराबादचे कार्यकर्ते सचिन कोठावदे यांनी या संदर्भात चलनबंदी निर्णयाचा ग्रामीण भागातील जनतेला थेट फटका बसला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुटय़ा पैशांअभावी जनता त्रस्त झाली असल्याने शासनाने गरीब जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना होणे गरजेचे आहे, असेही कोठावदे यांनी नमूद केले आहे.

शेतीची कामे ठप्प

चलन बदलण्यासाठी दिवसभराची रोजंदारी बुडवावी लागत आहे. बदली चलनात बँकेकडून १०० ऐवजी दोन हजार रुपयांचे चलन दिले जात असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. काही बडय़ा शेतकऱ्यांकडे मजुरांचा रोजचा पगार देण्यासाठी पैसे उपलब्ध असूनही सुटय़ा पैशांअभावी त्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. व्यापाऱ्यांचीही तशीच अवस्था असून कोणी फिरकत नसल्याने त्यांच्यावर हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. आधीच ग्राहक नाही. एखादा ग्राहक आलाच तर त्याला देण्यासाठी सुटे पैसे नाहीत. अशी अवस्था झाली असून काही व्यापारी ओळखीच्या ग्राहकांना उधारीवर माल देत आहेत. त्यामुळे दुकानदारांकडे उधारीची यादी मागील सहा ते सात दिवसांपासून वाढतच आहे. परंतु शेतमजुरांचे पोट हातावर असल्याने उधारीवर काम करण्यास ते तयार नाहीत. अशा शेतमजुरांना एखाद्या शेतकऱ्याने नवीन दोन हजार रुपयांची नोट दिली तरी त्या बदल्यात कोणी सुटे पैसे देत नसल्याने शेतमजुरांना त्या नोटेचा कोणताही उपयोग होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:54 am

Web Title: farm labor hunger due to 100 and 50 currency ban
Next Stories
1 परिस्थिती ‘जैसे थे’
2 अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याचा पहिला टप्पा पूर्ण
3 मृतदेहालाही नोटाबंदीचा फटका
Just Now!
X