बँकेत तारण ठेवलेले दागिने गहाळ झाल्यामुळे एका शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागत आहेत. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील एका शेतकऱ्याने खरीप पिकाच्या लागवडीसाठी घोटीतील एका राष्ट्रीयकृत बँकेत दागिने तारण ठेवले होते. यापैकी काही दागिने गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

बँकेत तारण ठेवलेले दागिने परत मिळावे यासाठी हा शेतकरी आपल्या कुटुंबासह गेली तीन महिन्यांपासून बँकेचे आणि घोटी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे. विष्णू निवृत्ती परदेशी या शेतकऱ्याने खरीप पिकाच्या लागवडीसाठी घोटीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तीन महिन्यांपूर्वी चार अंगठ्या व एक सोनसाखळी तारण ठेवून ८२ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. २० जूनला शेतकऱ्याने कर्जाची व्याजासह परतफेड केली. मात्र,या शेतकऱ्याला बँकेकडून चार अंगठ्याऐवजी केवळ तीनच अंगठ्या परत केल्या. शेतकऱ्यांनी आपल्याला एक दागिना कमी मिळाला असल्याची बाब बँकेच्या व्यवस्थापकांना सांगितली. मात्र व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली.

त्यानंतर गहाळ झालेले दागिने परत मिळविण्यासाठी परदेशी आणि त्यांचे कुटुंबीय तीन महिन्यापासून बँकेचे आणि पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत असून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आठवड्याभरात गहाळ झालेले दागिने परत मिळाले नाही तर आत्मदहन करेन, असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.