लोकसत्ता ऑनलाईन, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील संपकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात सलग चार तास चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात किसान क्रांती सभेने शेतकरी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकच्या पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकरी कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, आमदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार वसंत गीते यांनी या बैठकीत बोलण्यास सुरवात केली असता इतर सर्व शेतकऱ्यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला.

शेतकऱ्यांसाठी काय करता, यावर बोला असा आक्रमक पवित्रा घेत सर्व संतप्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. हा गोंधळ काही काळाने शांत झाल्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राज्यातील शेतकऱ्यांशी काल रात्री चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मात्र राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नसल्याने संपाचा हा लढा सुरुच राहणार असल्याची भूमिका आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकमताने घेतली. त्यामुळे कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.