24 October 2020

News Flash

नांदगाव तालुक्यात १० महिन्यांत  तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

नांदगाव तालुक्यात कोंब फुटलेला मका, जमीनदोस्त झालेली बाजरी आणि ज्वारी, शेतात सडणारे कांदे अशी परिस्थिती असल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यत दोन वर्षांत कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण नांदगाव तालुक्यात सर्वाधिक आहे. १० महिन्यांत अशा तीन आत्महत्या झाल्या आहेत. आधी नापिकी आणि पाऊस नसल्याने पडलेल्या दुष्काळामुळे, तर आता परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.

नांदगाव तालुक्यात कोंब फुटलेला मका, जमीनदोस्त झालेली बाजरी आणि ज्वारी, शेतात सडणारे कांदे अशी परिस्थिती असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. नेहमीच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या नांदगाव तालुक्याला यंदाच्या पावसाने ओला दुष्काळ आणून हतबल केले आहे. परतीच्या पावसाने तब्बल १० वर्षांनी नद्यांना पूर आले.

अवकाळीचा दणका ऐन पिके जोमात असताना आणि सोंगणीची वेळ आली असतानाच बसला. त्यामुळे उभी पिके आडवी झाली. काढणी केलेल्या पिकांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरले. तालुक्याचे अर्थशास्त्र शेतीवर अवलंबून आहे. येथे दुसरे उद्योग नाहीत. त्यामुळे बाजारपेठही कोलडली. सर्वत्र मंदीची लाट आली आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे पुढील नियोजन कसे करावे, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळेच शासनाकडून किमान यावेळी तरी कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सर्व थरांतून करण्यात येत आहे.

नांदगाव तालुक्यात १०० गावे असून खरीप हंगामातील मुख्य पीक बाजरी, कांदा, मका, कपाशी आहेत. तृणधान्याची ९०.७६ टक्के पेरणी झाली. पीक काढणीच्या हंगामात तालुक्यात ११ दिवसांत १०४ मिलिमीटर, नोव्हेंबरमध्ये ९६ मिलिमीटर पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ४४.२५० हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. बहुवार्षिक क्षेत्र ७६९ हेक्टर आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यकांचे ८९ जणांचे पथक पंचनामे करत आहेत.

कृषी अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाने ९८ गावांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून ८९०८ बाधितांचे ७१४२ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. – मनोज देशमुख (तहसीलदार, नांदगाव)

एक एकर कांद्याचे पीक अक्षरश: अवकाळी पावसात वाहून गेले. विहीर बुजली. मातीही वाहून गेली. यापुढे संसाराचा गाडा कसा रेटावा? – मच्छिंद्र वाघ (धनेर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 12:55 am

Web Title: farmer suicide akp 94
Next Stories
1 वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर
2 पंचनाम्यांसाठी ड्रोन, उपग्रहाधारित छायाचित्रांचा वापर करा
3 वाहनचालकांच्या बेशिस्तीला आधुनिक तंत्रज्ञानाचा चाप
Just Now!
X