शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जाची परतफेड कशी करणार या नैराश्यातून नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. शिवाजी गंगाधर सुर्यवंशी (वय ६७) असे या शेतकऱ्याचे नाव असून नांदगाव तालुक्यातील ढेकू या गावी राहणाऱ्या या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष प्राशन करुन आयुष्य संपवले.

ढेकु जातेगाव रस्त्यालगत सुर्यवंशी यांची चार एकर शेती आहे. या हंगामात कपाशीचे सात क्विंटल उत्पादन त्यांनी केले होते. हे उत्पादन विकून मिळालेल्या पैशातून शेती मशागतीचा खर्चही निघाला नाही. त्यानंतर शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी कांद्याची लागवड केली होती. त्यातूनही समाधानकारक पैसे त्यांना मिळाले नाही. जे पैसे त्यांना मिळाले त्या पैशातून घर कसे चालवायचे या चिंतेने ते व्यथित होते. तसेच बँकेचे २ लाख २५ हजार रुपये व इतर ८० हजार रुपये कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. यातून नैराश्य येऊन त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.